Sunday 31 March 2019

प्रलय-१०

प्रलय-१०

      आज जलधि राज्याची राज्य सभा भरली होती .  महाराज विक्रम , त्यांची काळी भिंत पाडण्याची आज्ञा ,  अंधभक्त ,  या साऱ्यांवर ती आज निर्णय होणार होता .  राज्यसभेत सर्व मंत्रीगण , राज्यातील काही प्रतिष्ठित लोक , महाराज विश्वकर्मा म्हणजे रक्षक राज्याचे प्रधान ,  त्यांची मुलगी अन्वी ,  युवराज देवव्रत असे सर्व जण जमले होते .

     प्रधानजी जलधि राज्यात पोहोचल्यानंतर कळालेल्या गोष्टींमुळे फारच आश्चर्य चकीत झाले .  अंधभक्तांची गोष्ट त्यांना भयकारक वाटली . अंधभक्तांना काळी भिंत अडवू शकत नाही म्हटल्या नंतर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला . संशोधन शाळेत झालेला किस्सा व त्यामागे असलेला मारूत राजाचा हात ऐकून त्यांना असुरक्षिततेची भावना दाटून आली , जी त्यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात कधीच अनुभवली नव्हती .

राज्यसभेत महाराज कैरव बोलत होते....
" काल बोलावलेल्या बैठकीत दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत ते म्हणजे कसेही करून काळी भिंत पाण्यापासून महाराज विक्रमांना थांबवायचं व दुसरे म्हणजे बाटी जमातीतील लोकांकडून बासरी बनवून ती धून वाजवायची शिकून घ्यायची.........
       दुसऱ्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झालेली आहे पण पहिला निर्णय कसा अमलात आणावा याबाबत मुख्यत्वे ही राजसभा बोलावलेली आहे . जलधि राज्याने वेळोवेळी घेतलेल्या निर्णयामुळे आज जलधिराज्य या समृद्धीच्या स्थितीला पोहोचले आहे . पण आज आपल्याला एक निर्णय घ्यावा लागणार आहे , तो म्हणजे महाराज विक्रमांना काळी भिंत पडण्यापासून थांबवण्याचा........ आत्ताच कळालेल्या बातमीनुसार महाराज विक्रमांनी त्यांची सर्व सैना काळ्या विहिरीपाशी जमा केली असून ते स्वतः त्या ठिकाणी निघालेले आहेत .  त्यामुळे भिंत पाडण्याचा त्यांचा निर्धार पक्का दिसत आहे . जर आपण भिंत पडण्यापासून त्यांना थांबवलं नाही तर अनर्थ होईल .  ज्या काही भिंती बाबतच्या गोष्टी आजपर्यंत आपण ऐकत आलो आहोत त्या खऱ्या असो की खोट्या .  एक गोष्ट मात्र नक्की आहे ती म्हणजे आतापर्यंत इतकी वर्षे कुणाचीही ती भिंत पाडण्याची हिम्मत झाली नाही .  आपले राज महर्षी सोमदत्त यांनीही याबाबत एक विचार करण्यायोग्य  सल्ला दिलेला आहे ,  त्यामुळे कसेही करून आपल्याला महाराज विक्रमांना ती भिंत पडण्यापासून रोखायलाच हवं......
त्यांना थांबवण्यासाठी आपण एकच गोष्ट करू शकतो ती म्हणजे रक्षक राज्य बरोबर युद्ध.......।

महाराज कौरवांच्या या वाक्याबरोबर संपूर्ण राज्यसभेत कुजबुज वाढली . पुन्हा एकदा लोक रक्षक राज्य ताब्यात घेण्याच्या घोषणा देऊ लागले .  त्यानंतर महाराज कैरव काही क्षण थांबले व बोलू लागले......
" मी जलधी राज्याचा अकरावा सम्राट ,  रक्षक राज्याचा राजा विक्रम याच्या विरोधात युद्ध घोषित करत आहे .  आपले युद्ध हे कुणा व्यक्ती , कुठले राज्य व कुणा राज्यातील जनतेच्या विरुद्ध नाही ,  तर त्या लोकांनी घेतलेल्या निर्णयाविरुद्ध आहे . जेवढं शक्य होईल तेवढी प्राणहानी टाळत आपल्याला फक्त आपला हेतू साध्य करायचा आहे  . तो म्हणजे राजा विक्रमाला कसेही करून ती भिंत पाण्यापासून थांबवायचे........

" मी आदेश देतो की आपले सैन्य गोळा करा , जे सैनिक सुट्टीवर आहेत , त्यांना बोलून घ्या . सर्व सैनिकांना गोळा करून आपण ताबडतोब रक्षक राज्यातील काळ्या विहिरीकडे कूच करणार आहोत.....।

महाराजांच्या ह्या गोष्टीनंतर राज्यसभेत एकच गोंधळ उडाला . जो तो महाराजांचा जयजयकार करत होता .
 जलधी राज्याचा जयजयकार करत होता .

सर्वांना शांत करत महाराज बोलले
" आपला हेतू आहे महाराज विक्रमांना ती भिंत पडण्यापासून थांबवायचा ,.त्यासाठी महाराज विक्रमांना त्यांच्या महाराज पदावरून काढून आपल्याला महाराज विश्वकर्माना रक्षक राज्याचे महाराज बनवावे लागेल..।।।
जे आज आपल्यात याठिकाणी उपस्थित आहेत....।

   मग महाराज कैरवांबरोबर , महाराज विश्वकर्मा यांच्या नावाचा जयजयकार सुरु झाला व जयजयकार करत करत राज्यसभा संपली......

   महाराज विक्रम भल्या मोठ्या रथामध्ये काळ्या विहिरीकडे  निघाले होते . त्यांचा हा रथ ओढण्यासाठी अकरा घोडे होते .  तो रथ एखाद्या बंद आलिशान खोली सारखा होता .  त्या खोलीमध्ये महाराज विक्रमांसाठी सर्व प्रकारची व्यवस्था होती .  त्या बंदिस्त चालत्या फिरत्या एका खोलीच्या राज महालातून महाराज विक्रम राजधानी कडून काळ्या विहीरीकडे कुच करत होते .  त्यांच्या बरोबर पाच हजार सैनिकांचा फौजफाटा होता . अडीच हजार सैनिक पुढे अडीच हजार मागे व मध्ये महाराज विक्रमांचा रथ होता .  हे पाच हजार घोडेस्वार सैनिक युद्धात निपून होते .  काळ्या विहिरीपाशी अजून पाच हजाराच्या आसपास सैनिक जमले होते । एकूण मिळून दहा हजाराची सैना काळी भिंत पाडण्यासाठी एकवटली होती . काळी भिंत आता पडणारच होती आणि आपल्या बरोबर अंधारच घेऊन येणार होती..........

   
   महाराज विक्रम सगळा फौजफाटा फाटा घेऊन काळ्या विहिरीकडे गेल्याने , राजमहालावरती फारसे सैनिक नव्हते . जे काही होते त्यांच्यापासून लपून छपून ,  एखाद-दुसरा सैनिक आला तर त्याचा काटा काढून ,  अधिरथ व सरोज या दोघांनी मिळून अद्वैत व त्याच्या साथीदारांना सोडवले . नंतर ते सगळे उत्तरेकडील जंगलाकडे निघाले . त्याच जंगलाकडे ज्या जंगलात महाराणी शकुंतला व महाराज सत्यवर्मा राहत होते , ज्या जंगलात महाराणी शकुंतलेला काही लोकांनी बेशुद्ध करून पळवलं होतं . त्याच जंगलाकडे ज्या जंगलाकडे भिल्लव , सार्थक आणि त्याचे साथीदार निघाले होते.......

         दूर कुठेतरी , कोणत्या तरी राज्यात , एका अंधाऱ्या जागी , अंधाऱ्या खोलीत , अंधारऱ्या सिंहासनावर ती राजा मारुत बसला होता . त्याचं घडणाऱ्या सर्व घडामोडींवर ती लक्ष होतं व कोणत्या चाली चलायच्या याचा तो विचार करत होता. 

No comments:

Post a Comment