Monday 30 April 2018

माझ्या कविता - २ जीवनसाथी

शूर वीर असा तो राजा
क्रूर कृती तयाची मजा
शिकार तयाला आवडे
वनात जाई तो सवडे
सूर्य असता मावळतीला
अद्याप न तो परतिला
वनात दिसता हरणी
तो प्रत्यंचेला बाण धरी
का तयाचे द्रवले चित्त
मन झाले अनुकंपित
हरिणीचे नेत्र देखिले
दया भाव मना छेदिले
त्याच स्थळे तो का स्थिरला
काळाचे भान विसरला
स्वप्न सृष्टीतचि  रंगे
ढोलाच्या  आवाजे तो भंगे
ढोल वाजते आवेशाने
असे किती गोंगाट वने
तरीही हरणी न हाले
असे ते आश्चर्य देखिले
वनात काही लोक वसे
उत्सव त्यांचा होत असे 
तयात एकाला पाचारी
हरिणीचे तया विचारी
ढोल जरी का वाजतसे
हरणी येथे उभी असे
पावलाचा आवाजे पळी
येथे उभी का ही पुतळी
मग सांगे वनवासी
ढोल एकाया ती येतसी
हे तो  नवलच ऐकले
राजा कारण विचारले
बोल असे वनवासीचे
हृदय भंगे ते राजा चे
कातडे असे जे ढोलाचे
ते तिच्या जीवनसाथीचे

1 comment: