Monday 6 April 2020

लफडं

 लफडं

   हात त्याचाच होता .  त्याच्या हातात दगड होता . रक्ताचे थेंब जमिनीवरती ठिबकत होते . त्याच्या समोर ती पडली होती .  तिचा कधीकाळी सुंदर दिसणारा चेहरा ,  आता फक्त रक्त व मांसाचा चिखल होता .  हातातील दगडा  धक्क्याने खाली फेकला . तिचा पडलेला मुडदा पाहून त्याला भडभडून उलटी आली . त्यानं तोंड बाजूला करायचा प्रयत्न केला , पण  त्याच्या पोटातील अर्धवट पचलेला अन्नाचा तो पिवळसर चिकट द्रव तिच्या विवस्त्र शरीरावरती पडला . ते दृश्य पाहून त्याला अजून जास्तच उबळ आली .  भिंतीचा आधार घेत त्याने भडभडून उलटी केली .  आता त्याच्या मेंदूला त्या दृश्याचा अर्थ लागला . त्याने दगडाने ठेचून तिची हत्या केली होती .  त्याची पत्नी , अर्धांगिनी ,  जिच्यासोबत त्याने संसार मांडला होता , अशी ती आता त्याच्यासमोर मरून पडली होती . त्याने तिला मारलं होतं . आता त्याचा राग ओसरला होता .  रागाच्या भरात चूक घडून गेली होती .  तिच्या निश्चल पडलेल्या मृतदेहाला मांडीवर घेऊन तो जोरात रडू लागला ,ओरडू लागला .

काही तासांपुर्वी .

 " मी जाऊन यितु जरा , उशीर हुइल यायला ..." तो म्हणाला

"  कुठं चाललाय , कशाचं काम हाय ....?" ती दारात उभी राहत म्हणाली

" काय न्हाय ,  बँकेचं काम हाय आणि परत खत बी आणायचा हाय...  संध्याकाळ हुइल , जनावराचं तेवढं बघ तू व्यवस्थित . नुसता टी व्ही बघत नकं बसू....

   तो असं म्हणाला आणि त्याच्या मोटरसायकलला किक मारून निघून गेला .  त्याचं घर आडबाजूला होतं . फारशी वस्ती नव्हती घराच्या आजूबाजूला . तो निघून गेला व तिने लगेच मोबाईल काढला . कोणाला तरी फोन लावला .

" तासा-दीड तासाने ये ,  कोणी नाही घरी ..." एवढंच बोलली आणि तिने फोन ठेवला . तो गाडी घेऊन निघाला खरा पण पुढे जाऊन गाडी बाजूला काढून लपून राहिला . 

      लफडं . गावात कधी लपून राहत नाही .  त्याच्या कानावर कुरबुर आलीच होती , तिला रंगेहात पकडायचं असे त्याचे नियोजन होतं . त्याने त्याचा फोन काढला उगाच काहीतरी करत बसला . प्रत्येक क्षण त्याला त्रासदायक वाटत होता . मनोमन तो हे सारं खोटं असावं अशी प्रार्थना करत होता . त्या अफवाच असाव्यात असं त्याला वाटत होतं . अफवा पण काही हवेतच बनत नसतात . एकदाच काय तो निकाल लावायचा असे त्याने ठरवलं होतं . त्यांच्या लग्नाला तेरा वर्षे झाली होती .  एकुलता एक मुलगा बोर्डिंग शाळेत शिकायला होता .  त्याला तीन एकर शेती होती , पाणी कमी असल्यामुळे त्यातून उत्पादन निघायचं नाही . त्यातून बोर्डिंग शाळेचा खर्च अधिक , त्यामुळे तो मिळेल ती शेत मजुरीची कामे घ्यायचा . तो कष्टकरी होताच . आई-बाबाच्या एका खोपटा पासून त्याने सुरूवात करून एक चार खोल्यांचे घर बांधलं होतं , तेही स्वतः घेतलेल्या तीन एकर जमिनीत .

   सर्व काही व्यवस्थित चाललं असेल तर कुठेतरी माशी शिंकते आणि काहीतरी घोळ होतोच . बऱ्याच दिवसापासून त्याच्या कानावर त्याच्या बायकोच्या लफड्याविषयी गोष्टी येत होत्या . सरळ सरळ नाही पण कळतात लोकांच्या बोलण्यावरून , हावभावावरून अशा गोष्टी .  म्हणूनच त्याने हा डाव मांडला होता . त्याला वाटायचं , घरी जावं आणि तिला सरळ सरळ विचारावं.  पण विचारणार काय ...? कसं बोलणार...?  काय सांगणार ....?  अफवांवर विश्वास ठेवून स्वतःच्या पत्नीवर संशय घ्यायचा का...?  आणि तसं नसलं तर उगाच  वाद . त्यापेक्षा हा डाव चांगला . तसं काही नसलं तर विषयच नाही आणि असेल तर काय तो सोक्षमोक्ष लावून टाकायचा...

     तो बराच वेळ बसुन होता .  तासाभराने एक दुचाकी त्याच्या घराकडे जाताना दिसली . तो मनाचं समाधान करून घेत होता . ' असेल कुणाचातरी शेताकडे आलेला '  .  त्याच्या घराच्या रस्त्याला दुसरी घरे नव्हती , पण लोकांची बरीच शेती होती .  त्यांच्या गाड्या अधून-मधून यायच्या .

    गाडी निघून गेल्यानंतर तो बराच वेळ थांबला .  खरं काय ते उघड होणार होतं , मात्र त्याचा सामना करायला त्याचं मन तयार नव्हतं . जर खरंच तिचं लफडं चालू असेल तर काय ....? या प्रश्नाचे उत्तर त्याच्याकडे नव्हतं .  त्याने तसा विचारच केला नव्हता . त्याने गाडी बाहेर काढली व घराकडे निघाला .  घरापासून काही अंतरावर  त्याने गाडी थांबवली . घरापुढे असलेल्या चिंचेच्या झाडाखाली एक गाडी लावलेली होती . तो जो कोणी होता त्याने ती गाडी बाजूला किंवा दुसरीकडे लपवण्याचे जरादेखील कष्ट घेतले नव्हते . ही गाडी त्याला ओळखीची वाटत नव्हती ,  तो कोण होता हे त्याला आत गेल्याशिवाय कळणार नव्हते .

   वैरी न चिंती ते मन चिंती .  घराचं दार बंद होतं , कधीच त्यांच्या घराचं दार बंद नसायचं .   घरात त्याची पत्नी व दुसरा कोणीतरी होता .  बाहेर तिचा पती उभा होता .  त्याच्या डोक्यात नको ती चित्रे उभा राहिला वेळ लागला नाही .  त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली .  तो धावत गेला आणि दार वाजवू लागला . बराच वेळ गेला  तरी दार उघडले जात नव्हतं . त्याचा संयम संपला . ते तकलुपी असलेल्या लाकडी  दाराला तो जोरात धक्के देऊ लागला .  काही धक्क्यानंतर  दार उघडले . दार उघडल्या नंतर लगेच समोर हॉल होता , त्याला लागूनच उजव्या हाताला किचन होते व किचनच्या मागे बेडरूम होती . तो पटापट पावले टाकत हॉलमधून किचनमध्ये व तिथून बेडरूममध्ये गेला . झोपायच्या खोलीला मागे उघडणारे दार होते .  ते सताड उघडे होते , तो जो कोणी होता तो तिथून पळाला होता . त्याची पत्नी विवस्त्र होती .  तिने स्वतःभोवती पटकन साडी गुंडाळून घेतली होती .

   " कुठाय त्यो ? कोणाय त्यो .. ?"

    आणि तो पुन्हा दाराकडे निघाला.  तेव्हाच  दारात उभी असलेली गाडी चालू झाल्याचा आवाज आला . तो पळत बाहेर आला . गाडी रस्त्याला लागली होती . त्याने एक दगड उचलला व नेम धरून मारला . दगड त्या गाडी चालवणाऱ्या डोक्याला बसला . गाडी वेगात असल्यामुळे व अचानक डोक्याला लागलेल्या दगडाने त्याचा तोल ढासळला आणि तो गाडी घेऊन कोसळला .  गाडीच्या खाली पाय येऊन त्याचा पायाला जखम झाली . तो वेदनेने कळवळला .  तोपर्यंत हा जवळ आला आणि  पाहिलं  . दुसरा पुरुष त्याच्या ओळखीचा होता .  त्याने त्याच्या तोंडावर जोरात लाथ मारली ...

"  तुझ्या आयचा *** , आयघाल्या... का...."

 " विचार की तुझ्या बायकोला ...? "

  त्याही परिस्थितीतही तो दुसरा पुरुष स्वतःच्या कृतीचा गर्व असल्यासारखं बोलत होता .  सहा महिन्यापूर्वी घराचे रंगकाम काढलं होतं .  रंगकाम गावातल्या एका पोराकडे दिल होतं . तो तोच होता .  रंग द्यायच्या वेळेस तो मजुरीसाठी बाहेर गावी गेला होता . त्याला राग आला . त्या पोराचं त्याला माहीत होतं , पण स्वतःच्या बायकोने असं का वागावं हे त्याला कळत नव्हतं . तो रागात घराकडे निघाला .  त्याची बायको दारात उभी होती . कशीतरी साडी गुंडाळली होती . दारातून आत जाताच त्याने तिला जोरात मुस्काटीत मारली . तोंडातून सासुचा अवयवांचा उद्धार करणाऱ्या शिव्या चालू होत्या .

" का ...? "  त्याने विचारलं ती काहीतरी बोलत होती .  त्याचे डोळे , कान सर्वकाही रागाने भरले होते . त्याला ऐकू येत होतं ,  पण रागाचा ज्वर असलेल्या मेंदूला शब्दांचा अर्थ लागत नव्हता . त्याच्या डोळ्यातून येणाऱ्या आसवांमुळे त्याला नीट दिसत नव्हतं .

" कशाला घातलीय आता साडी . त्याच्या खाली झोपली तवाच सगळी लाज आब्रु वेशीला टांगली त्वा.."

      त्याने साडीचा पदर खेचुन तिला विवस्त्र केलं .

" माझं ऐकून तर घ्या ....?

" काय ऐकायचं तुझा ग...?  दुसऱ्या बायांकडे मी नजर वर करून दिकुन बघत नाही , सुपारीच्या खांडाचसुदिक यसन न्हाय , अन् तु असली थेरं करती व्हय....

    त्याने तिला लाथाडले . तीही रडत होती .

" का ..? सांग... न्हायतर...."

     तो मारायला काहीतरी शोधण्यासाठी इकडे तिकडे पाहत होता .  किचनमध्ये असलेला तो दगडी गोटा त्याला दिसला .

" नुस्त पैशाच्या मागून लागून चालत नसतंय बायकोकडंबी लक्ष द्यायचं असतंय.......  " बाहेरुन आवाज आला व तो गाडीवर निघून गेला . त्याच्याकडे परत पाहता येईल म्हणून तो तिच्याकडे वळला .

" काय कमी होतं तुला ...? बोल की .." तो खाली बसत म्हणाला .

   ती घाबरली होती .त्याच्या हातातून गोटा पाहून तिची दातखीळ बसायची राहिली होती .

"  काय न्हाय ,  काय कमी नव्हती ,  मी चुकले...."  ती कशीबशी म्हणाली .

    अजून शिव्या हासडून तो म्हणाला ,
" का माझी अब्रू काढली तु का ...? "
      काहीतरी बोलण्यासाठी तिनं तोंड उघडलं पण त्या अगोदरच तो दगड तिच्या तोंडावर पडला आणि पडतच गेला . जोपर्यंत त्याचा राग होता तोपर्यंत . चेहऱ्याची हाडे तुटली , मांसाचा चिखल झाला.  रक्ताचे शिंतोडे त्याच्या सर्वांगावर उडाले .

       त्याला कधीच कळलं नाही ती तशी का वागली . तेरा वर्षांचा संसार , बारा वर्षाचं मुल ,  सगळं काही चांगलं असताना तिला दुर्बुद्धी का सुचली . तिने काही सांगण्या अगोदरच त्याने तिला संपवून टाकले .

      आता तिचा मृतदेह घेऊन तो रडत होता . टाहो फोडत होता . माफी मागत होता .  चुकलं म्हणत होता ,  पण घडलेलं घडून गेलं होतं .  ती आता जिवंत होणार नव्हती.....
       

No comments:

Post a Comment