Sunday 24 March 2019

प्रलय-०३

प्रलय -०३

     जलधि राज्याचे अधिपती राज्यांची निर्मिती झाल्यापासून कैरव राजे होते  . सध्या अकरावे कैरव महाराज राज्य करत होते. महाराज वृद्ध होते . शुभ्र पांढऱ्या केसांवरती सोनेरी मुकुट होता. वृद्धत्व आलेलं असूनही चेहऱ्यावरती एकही सुरकुती नव्हती .  राज्याला दोन बाजूंनी समुद्राच्या सीमा असल्यामुळे त्याचं नाव जलधि पडलं होतं. जलधि हे राज्य इतर सर्व राज्यांपेक्षा भरभराटीचे राज्य होतं . असं म्हणतात जलधि मधील भिकारी हे बाकीच्या जगातील श्रीमंतपेक्षा श्रीमंत असतात. त्याच जलधि राज्याच्या राजमहालात आज ही राज्य सभा भरली होती . राजमहाल किती आलिशान होता .  त्या ठिकाणी सिंहासने नव्हती तर कमलासने होते .  शुभ्र पांढऱ्या संगमरवरी दगडापासून बनवलेल्या कमळाच्या आकाराच्या आसना वरती कैरव महाराज आसनस्थ झाले होते.  बाकीच्या मंत्रीगणांसाठी ही कमळाची आसने होती  . ती राज्यसभा अर्धवर्तुळाकार होती . वर्तुळाच्या केंद्रस्थानी महाराज होते व वर्तुळाच्या परिघावर ती मंत्रीगणांसाठी आसने होती.  महाराजांच्या बरोबर समोरून राज्यसभेत येण्याचा मार्ग होता . आसनांच्या आजूबाजूला इतर प्रजाजनांसाठी बसण्याची सुविधा केली होती. आज ही राज्यसभा काठोकाठ गच्च भरली होती.  विषयही तितकाच गंभीर होता. हेर पथकाचे प्रमुख कौशिक समोर येऊन महाराजांना सांगत होते.....
   " महाराज सर्वांनाच ज्ञात आहे पश्चिमेच्या रक्षक राज्याची तेव्हाच अधोगती सुरू झाली जेव्हा महाराज सत्यवर्मांनी ते अघोर कर्म केले ,पण आता त्यांचा पुत्र महाराज विक्रमांनी जे काही चालवले आहे त्याची फळे आपल्यालासुद्धा भोगावी लागणार आहेत. महाराज विक्रमांनी काळी भिंत पाडण्याचे आदेश दिले आहेत.......

कौशिका च्या या वाक्यासरशी संपूर्ण राज्यसभेत कुजबूज सुरू झाली . कौशिक पुढे बोलू लागला....
 " त्यांच्या काही मंत्रीगणांनी त्यांच्या या निर्णयाचा विरोध केला , तर महाराजांनी त्यांना  बंदी बनवून फाशी देण्याची शिक्षा सुनावली आहे  .  यामध्ये त्यांच्या प्रधानजींचा आणि समावेश आहे . रक्षक राज्याचे सैन्य काळ्या भिंतीकडे रवाना झालेले आहे .  कोणत्याही दिवशी ते काळ्या भिंतीपाशी पोहोचून ती भिंत पाडण्याची प्रक्रिया सुरू करेल......

या वाक्यानंतर पुन्हा एकदा कुजबुज सुरू झाली . मधूनच आवाज येऊ लागले.....
" रक्षक राज्यावर स्वारी करा.... "रक्षक राज्य ताब्यात घ्या...... विक्रमांचा वध करा.... रक्षक राज्य ताब्यात घ्या......

तेव्हा महाराज कैरव म्हणाले , " शांत व्हा , कोणताही निर्णय विचार न करता घेतल्यास त्याची फळे आपल्याला भोगावी लागू शकतात .......काळ्या भिंतीच्या अनेक गोष्टी आपण ऐकल्या आहेत  ,पण त्या फक्त गोष्टी म्हणूनच ऐकल्या आहेत . त्याची शहानिशा करण्यासाठी कौशिक यांनी आपले काही निष्णात हेर काळ्या भिंतीपलीकडे पाठवले होते . कौशिक त्यांची काही खबर आली आहे का....?

" होय महाराज आपण एकूण चार हेर काळ्या भिंतीपलीकडे पाठवले होते . त्यातील फक्त एकालाच माघारी आणण्यात यश आलं आहे .
त्याच वेळी सभेतून आश्चर्यकारक उद्गार बाहेर पडले.
   "  तुमच्या संमतीने त्या हेराला तुमच्या समोर आणू इच्छितो.....

" संमती आहे कौशिक , लवकरात लवकर त्या हेराला राज्यसभेत उपस्थित करा....
" महाराज तो हेर बोलण्याच्या परिस्थितीत नव्हता ,  वेड्यासारखा  काहीही बोलत होता . आपल्याला  राजवैद्यांनी त्याला औषधी देऊन निद्रिस्त केलं आहे .....

कौशिक आणि त्यांच्या सैनिकाला त्या हेराला आणण्याची आज्ञा दिली . एक चालता-फिरता तुरुंग , एका   खोली एवढा तो तुरुंग  मोठा होता . त्या तुरुंगामध्ये मध्ये दोन संपूर्ण वाढ झालेले मोठे वाघ डरकाळ्या फोडत इकडे तिकडे फिरत होते . त्या तुरंग्याच्या मधोमध एका छोट्याश्या पिंजरात त्या हेराला साखळदंडांनी बांधून ठेवले होते . तो तुरुंग दहा हट्ट्याकट्ट्या मल्लांनी ओढत राज्यसभेत आणला .
"  कौशिक हे काय चालवलय,  आपल्याच हेरास पिंजऱ्यात का म्हणून कोंडलं आहे ....? आणि ते वाघ कशासाठी आणले आहेत  ? आपलाच माणूस  वाघाच्या भक्ष्यस्थानी द्यायची हिंमत तरी कशी झाली तुझी ,  मोकळं करा त्याला आत्ताच्या आत्ता.....!
कैरव महाराज रागा रागाने बोलले..
" महाराजांनी गैरसमज करून घेऊ नये . आपल्या सर्वांच्या संरक्षणासाठीच त्याला पिंजऱ्यामध्ये कोंडलं आहे महाराज......
" म्हणजे काय म्हणायचं आहे नक्की तुम्हाला.....?
" महाराज मी सांगत बसायला जास्त वेळ घालवत नाही तुम्ही स्वतः पहा........
कौशिकाने एका सैनिकाला काहीतरी सूचना दिली . तो सैनिक पळत जाऊन त्या तुरुंगाच्या वर चढला .  तुरुंगाच्या वर  बरोबर मध्यभागी जात त्याने एक पाण्याची बादली घेतली व त्या हेरावरती मोकळी केली .
तो जागा झाला.  तो सामान्य माणसा सारखा दिसत होता .  पण जेव्हा त्याला शुद्ध आली तो ओरडू लागला....
" सिरकोडा इसाड कोते ......
" सिरकोडा इसाड कोते ........
तो मोठ्या आवाजात ओरडत होता .  ओरडतच त्याने त्याच्या पिंजऱ्याचे गज त्याच्या हाताने सहजपणे उपटून बाजूला फेकायला सुरुवात केली . तो पिंज-यातून बाहेर आल्यावर डरकाळ्या फोडणारे वाघ  त्याच्यावरती धावून गेले . तो हेर चपळतेने त्या वाघाचा हल्ला चुकवत होता . जेव्हा एका वाघाने त्याचा पाय पकडून त्याला ओढून खाली पडले त्याचवेळी दुसरा वाघाने त्याच्या दंडाचा लचका तोडला . संपूर्ण सभेतून विविध आश्चर्यकारक उद्गार येत होते .  त्याच्या दंडाचा मांसाचा तुकडा निघाला होता तरी त्याच्या चेहऱ्यावर वेदनेचा एकही अंश दिसत नव्हता   .  उलट तो जोरजोराने ओरडत होता ,

" सिरकोडा इसाड कोते ......, सिरकोडा इसाड कोते ......सिरकोडा इसाड कोते ......

ज्या वाघाने त्याच्या दंडाचा लचका तोडला होता त्या वाघाचे पुढचे दोन पाय धरून , गोल गोल फिरवत त्याला तुरुंगाच्या सळ्यावरती आपटले . जोरात आपटल्यामुळे त्या वाघाच्या मांसाचे शितोडे संपूर्ण राज्यसभेत उडाले .  त्याबरोबर सभेतून भयकारक उद्गार निघाले . दुसरा वाघ घाबरून एका कोपर्‍यात जाऊन लहान आवाजात गुरगुरत मुडपून बसला . तो हेर अजूनही
" सिरकोडा इसाड कोते ......
सिरकोडा इसाड कोते ......"
असं ओरडतच होता . त्या बसलेल्या वाघाकडे जात त्या वाघाचे मस्तक त्याने आपल्या हाताने सहज धडावेगळे केले.  आता तो मुख्य तुरुंगाच्या सळ्या तोडायला बघत होता.   राज्यसभेतील लोकांमध्ये भीतीची लहर उसळली .  लोक घाबरून पळू लागले . त्या हेराने मुख्य तुरुंगाच्या सळ्या तोडल्या व बाहेर पडून महाराज कैरवाकडे  जाउ लागला . त्याबरोबर संपूर्ण राज्यसभा घाबरून पांगू लागली . सैनिक महाराज कैरवांकडे धावू लागले . पण काही अंतरावर जाताच तो हेर जागेला थांबला आणि पुन्हा मोठमोठ्या आवाजात ओरडू लागला
" सिरकोडा इसाड कोते ......
" सिरकोडा इसाड कोते ......

" ही राज्यसभा आत्ताच भंग होत आहे...."  महाराज कैरवांनी मोठ्या आवाजात आदेश दिला  " कौशिक त्या हेराला आपल्या संशोधन शाळेत घेऊन या .    बाकीच्या मंत्रिमंडळींनीही   त्या ठिकाणी उपस्थित रहावे . आपल्याला लवकरच काही ना काही निर्णय घ्यावा लागणार आहे . रक्षक राज्यातील आपल्या हेरांना व सैनिक पथकाला सूचना पाठवा , युवराजांना घेऊन ताबडतोब जलद इकडे निघायला सांगा...... ....


      सरोज व भिल्लव सैनिकांच्या वेशात गुप्त भुयारी मार्गाने प्रधानजींची सुटका करायला तळघरातील तुंरूगा कडे निघाले होते .
   " भिल्लवा आपण त्या अधिरताला  मारून  टाकायला हवं होतं ,  तो सुटला तर....
  " सरोज तू घाबरू नको आतापर्यंत माझ्याकडून कोणीही सुटले नाही ,
 " काय बोलतो आहेस , ज्यावेळी पहिल्यांदा  तू मला आणत होता ,  त्यावेळी मी तीनदा सुटले होते ,
" त्यावेळी मी नवखा होतो , आता माझ्याकडे अनेक क्लुप्त्या आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यावेळी मी तुझ्यावरती मोहित झालो होतो.....
  दोघेही भुयारी मार्गातून जात होते . सात ते साडेसात फूट व्यासाचा वर्तुळाकार भुयारी मार्ग होता तो . तो नेहमीच्या वापरातील नसल्यामुळे ना तिथे दिवाबत्तीची सोय होती ,  ना चालायला  येत होते . दोघे धडपडत पुढे सरत होते . भिल्लवाच्या हातात मशाल होती .  त्या मशालीच्या उजेडात ते दोघे पुढे सरकत होते  .

  भुयार पुढे सरकत होते . एके ठिकाणी भुयाराला दोन्ही बाजूनी अजून दोन मार्ग येऊन जुळत होते  . त्यांच्या उजव्या बाजूच्या मार्गावरून त्यांना कुजबुज ऐकू येत होती आणि मशालीचा उजेडही येत होता .
सरोजने भिल्लावाच्या डोक्यात जोरात मारले " तू तर म्हणाला होतास कि हा मार्ग कुणालाही माहित नाही ,  मग ते कोण आहेत पहाऱ्याचे सैनिक......?
दोघेही सावधानतेचा पवित्रा घेऊन हल्ला करण्याच्या तयारीत उभे राहिले . भिल्लव एका बाजूला व सरोज दुसऱ्या बाजूला उभी होती .  भिल्लवाच्या हातातील मशाल त्याने विजवून टाकली होती .  सरोजने हातात तेथीलच एक दगड उचलला होता . त्यांची कुजबुज ऐकू येत होती .
" अन्वी तुला नक्की खात्री आहे ना हाच तो भुयारी मार्ग आहे ते....
" होय देवव्रत मी बाबांबरोबर बऱ्याच वेळा या ठिकाणी आली आहे.....
" अग सरोजज या तर राजकुमारी अन्वी आहेत , टाक तो दगड खाली.....
 भिल्लव समोर जात म्हणाला ,
" राजकुमारी अन्वी तुम्ही या ठिकाणी काय करत आहात तुमच्या साठी हे बरोबर नाही.....
अचानक समोर आलेल्या भिल्लवला पाहून राजकुमार देवव्रताने तलवार काढून भिल्लवावरती उगारली ...
" देवव्रता ते भिल्लवकाका  आहेत हेरपथकाचे प्रमुख.
" तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे मला राजकुमारी म्हणत जाऊ नका मला म्हटलेलं आवडत नाही....
" पण तुम्ही या ठिकाणी काय करत आहात...
राजकुमारी बोलण्या अगोदरच देवव्रत म्हणाला
" आम्ही महाराज विश्वकर्मा यांना सोडवायला जात आहोत.....
" युवराज देवव्रत प्रधानजींचा महाराज विश्वकर्मा असा उल्लेख देशद्रोह आहे . सर्वांदेखत असा उल्लेख करत जाऊ नका अन्यथा तुम्हाला ही त्याच तुरुंगात राहावे लागेल .
"  राजकुमारी आपण हे संकट पत्करू नका , तुम्ही जा .  मी व सरोज प्रधानजींना सोडवायला जात आहोत आणि युवराज देवव्रतांना ताबडतोब जलधि राज्यात परतण्याचे आदेश आहेत .
" युवराजाला कोणाकडूनही आदेश घेण्याची गरज नाही
" युवराज आपले पिताश्री महाराज कैरव यांनी हा आदेश दिला आहे . वर नगरांमध्ये तुमचा शोध सर्वत्र सुरू आहे ....
" परंतु महाराज विश्वकर्मा यांना याठिकाणी सोडून जाणं युवराजाला शोभणारं नाही..... देवव्रत ठाम होता
" भिल्लव काका आम्ही ठरवलेलं आहे , पिताश्रींची सुटका करून त्यांना घेऊन आम्ही जलधिराज्यामध्ये जाणार आहोत.....
" पोरगी हट्टी दिसते , येऊ दे तिला पण बरोबर , उशीर करायला नको आपण जाऊया पटपट.....
सरोज विझलेली मशाल पेटवून म्हणाली...
शेवटी चौघांचा ताफा त्या तळघरातील तुंरूगाकडे निघाला....
 
  उत्तरेच्या जंगलात महाराज सत्यवर्मा व महाराणी शकुंतला अजूनही राहत होते .  ठराविक विश्वासू लोकांनाच त्यांचा हा ठिकाणा माहीत होता . त्या छोट्याशा पर्णकुटीत ते दोघे व त्यांच्या साठी लागणारी दुभती जनावरे होती . त्या छोट्याशा पर्णकुटी मागे त्यांना लागणारी कंदमुळे होते . बाकीचा ऐवज वेळोवेळी नगरातून पाठवला जात असे . 
रोज रात्री जेवणानंतर महाराज सत्यवर्मा ध्यान-धारणा करीत असत  . आजही ते ध्यानधारणेसाठी मृगचर्मा वर बसलेले असताना महाराणी शकुंतलेला ते सहन झाले नाही .
   " दुपारी नगरातून दूत आला होता .  विक्रमाने काळी भिंत पाडायची आज्ञा दिली आहे . विश्वकर्म्यालाही तुरुंगात टाकून फाशीची शिक्षा सुनावली आहे . तुम्ही किती काळ असेच गप्प बसणार आहात ? तुम्ही काहीतरी करायलाच हवं ...! राज्य व राज्याची जबाबदारी टाकून ,  तुमचं कर्तव्य सोडून  , तपश्चर्या केली तरीही काही प्राप्त होणार नाही . कारण जो आपले कर्तव्य पूर्ण करत नाही त्याला ईश्वर सुद्धा प्रसन्न होत नाही .....
    महाराज  सत्यवर्मांनी डोळे देखील उघडले नाहीत .  त्याची चीड येऊन महाराणी शकुंतला त्या पर्णकुटीतून बाहेर पडल्या , बरोबर त्यांनी छोट्या राजकुमारांनाही घेतले . हा राजकुमार सत्यवर्मा व शकुंतला यांचा दुसरा मुलगा होता .   विक्रम हा शकुंतला व '_त्याचा_' पुत्र होता .  हे फक्त महाराणी शकुंतलेला माहित होते .  बाकी सर्व जनता असेच समजत होते की महाराज विक्रम हे  सत्यवर्माचेच पुत्र आहेत . पाठीवरती खऱ्या राजकुमारांना घेऊन घोड्यावरती बसून त्या नगराच्या दिशेने निघाल्या .....

No comments:

Post a Comment