Tuesday 23 October 2018

जत्रा एक भयकथा ( संपूर्ण)

काटेवाडी गावाला जत्रेची परंपरा जुनीच . फार वर्षापासून ही जत्रा होते . चार दिवस जत्रा चालते गावातील सर्व लोक तेथे जातात . गावातीलच नाही तर आजुबाजुच्या गावाचे तालुक्याचे सारेच लोक येथे येतात त्यामुळे जत्रा गर्दीत होते . जत्रेत वेगवेगळी दुकाने थाटली जातात उंच उंच पाळणे छोट्या छोट्या रेल्वे गाड्या तसेच लहान मुलांना आकर्षित करणारे वेगवेगळे घटक असतात. वेगवेगळ्या नाश्त्याची , ज्यूसची , प्रसादाची , चिरमूऱ्याची , धार्मिक पुस्तकांची नि कशाकशाची दुकाने जत्रेत लागतात . चार दिवस चालणाऱ्या या जत्रेत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते . सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे तमाशा ऑर्केस्ट्रा कुस्त्या आणि काय काय …..। मागच्या पाच सहा वर्षापासून पहिल्या दिवशी कुस्त्यांचे जंगी मैदान होते , दुसऱ्या दिवशी तमाशा होतो, तिसऱ्या दिवशी ऑर्केस्ट्रा होतो , नि शेवटच्या दिवशी गाव-जेवन असते . या जत्रेच्या बहुरंगी कार्यक्रमात लोक आपले सुख दुःख विसरून आनंदाने सामील होतात . जत्रेतील सगळ्यात सांस्कृतिक कार्यक्रमांना गर्दी असाते मात्र खासकरून तमाशाला नि ऑर्केस्ट्राला जास्तच गर्दी असायची . लोक दोन-दोन तास आधी येऊन बसायचे पुढे बसण्यासाठी लोकांची भांडणे व्हायची .

आज ऑर्केस्ट्राचा दिवस होता आणि गण्या मन्या राम्या यशा आणि आबा राम्याच्या घरची मका करायला व्यस्त होते. मिशन वाल्याने उशीर केल्याने त्यांना ऑर्केस्ट्राला जायला उशीर होणार होता .

“ आईला राम्या तुला दुसरा दिवस घावला नाही का मका करायला “ मन्या वैतागून म्हणाला

“ नाहीतर काय आता कुठली मिळते आपल्याला पुढे जागा ” आबा मन्याच्या बोलण्याला दुजोरा देत म्हणाला

“ असुद्या रे घ्या संभाळून आपलाच मित्र आहे तो त्याला मदत करायची नाही तर कोणाला मदत करायची ” गन्या राम्याची बाजू घेत सगळ्यांना म्हणाला . “ झाल आता ही शेवटचं पोतं टाकू या आणि पाच मिनिटात सगळं आवरून पारावर भेटूया “

काटेवाडी गावची दीड-दोन हजार लोकसंख्या असली तर निम्म्या लोकांहोऊन अधिक लोक वाड्या वस्त्यावरती राहायचे. हे पाच मित्र ही काटे वस्ती वरती रहायचे . गावापासून दूर दीड-दोन किलोमीटर अंतरावर असणारी काटे वस्ती आणि तेथील हे पाच मित्र आज रात्री भलत्याच संकटात अडकणार होते . काटे वस्ती वरून गावात जायला तशी एकच वाट त्याच वाटेने लोकांची ये-जा चालायची मात्र त्या वाटेने चालत जायला अर्धा ते पाऊण तास लागायचा . या वाटेमुळे दीड-दोन किलोमीटर अंतरावर असणारे गाव तीन ते साडेतीन किमी व्हायचे . तशी दुसरी एक वाट होती पण ती वाट दिवसा वापरायलाही लोक भ्यायचे त्या वाटेचे नाव होते पाद्र्याची वाट . पाद्र्याच्या वाटेबद्दल बऱ्याच अख्यायिका प्रसिद्ध होत्या . या आख्यायिका गावात फक्त दिवसाच आवडीने चगळल्या जायच्या मात्र कोणीही पट्टा त्या वाटेने जायला तयार नसायचा . गावातील प्रत्येकाचे स्पष्ट मत होते की त्या वाटेवर पाद्र्याचे भूत आहे . कोणी कोणी ते भूत पाहिले होते तर कोणी कोणी त्या भूताला अमावस्येच्या रात्री कंदील घेऊन फिरताना पाहिले होते . कोणी कोणी तर चक्क भुताचा आवाज हि ऐकला होता तो पादरी इंग्रजी माणूस असल्याने तो इंग्रजीत बोलत असणार हे साऱ्यांनी गृहीत धरून भूत हे इंग्रजी बोलत होते इंग्रजी गाणे म्हणत होते असे गावात पसरवले होते .


ठरल्याप्रमाणे पाचच मिनिटात आवरून गाण्या पारावर पोहोचला . बघतो तर अजून कोणच आले नव्हते त्यामुळे तो जाम वैतागला तो मन्याला हाक मारायला जाणार तेवढ्यात त्याला मन्या येताना दिसला .
“ आईला मन्या आधीच उशीर झाला आहे आणि हे अजून आले नाहीत आपल्या आपणच जायचं का का बोलवायला जाऊया त्यांना “ गाण्या मन्याला म्हणाला तेवढ्यातच उरलेले तिघे त्याला येताना दिसले त्यांना दोन चार शिव्या देऊन वक्तशीरपणाचे लेक्चर गण्याने उरकून टाकले

        अगोदरच उशीर झाला असल्यामुळे गण्या म्हणाला की आता आपण पाद्र्याच्या वाटेने गावाकडे जायचे.
राम्या आणि मन्या तयार झाले मात्र यशा आणि आबा घाबरून लांबच्या वाटेने जाऊया असं कळकळीने गन्या राम्या आणि मन्याला सांगू लागले . गन्याला मागं बसनं अजिबात पसंत नव्हतं म्हणून जवळच्या वाटेने पटकन जाऊया असं त्याचं म्हणणं होतं . त्यावेळी आबाने पद्र्याच्या भुताची आठवण करून दिली त्याच बरोबर कंदील घेऊन फिरणाऱ्या पांडबाची भीतीसुद्धा आबाने गाण्याला दाखवली मात्र गन्या त्यांना घाबरणाऱ्यातला नव्हता . “ भागुबायांनो तुम्ही जावा लांबच्या वाटेने पण आम्ही पाद्र्याच्याच वाटंन जाणार “ असा टोला मारून गन्या राम्या आणि मन्या पाद्र्याच्या वाटेने निघाले .


या पाद्र्याची नि पाटलाच्या पोरी ची चमत्कारिक प्रेम कथा ही गावात फारच प्रसिद्ध होती . साधारणपणे सांगितलं जायची की ६० - ७० वर्षापूर्वीच्या काळात हे लफडं ( गाववाल्यांच्या भाषेत ) झालं .

पूर्वीच्या काळी ख्रिश्चन लोक धर्मप्रसारासाठी गावोगावी जात असत त्यासाठीच पाद्री गावात आला होता आणि त्याने ख्रिश्चन धर्म प्रसार सुरू केला होता . गावाच्या पाटलाची पोरगी की मुंबईला शिकून आलेली त्यामुळे बऱ्याच पुढारलेल्या विचारांची होती . तिचं नाव शेवंता होतं . शेवंता जर रविवारी चर्चमध्ये प्रार्थनेला जायची. चर्च म्हणजे काही फार प्रशस्त व मोठा नव्हता . तिथल्या तिथे प्रार्थनेसाठी म्हणून छोटासा चर्च पाद्रीने बांधून घेतला होता . एरवीही वेळ मिळेल तेव्हा ती त्याला भेटायला जायची . चर्चमध्ये प्रार्थनेसाठी फार थोडे लोक जमायचे मात्र काही गोष्टी गावभर पसरावयच्यख असल्या तरी जास्त लोकांची गरज लागत नाही . जंगलात वनवा जसा पसरत असतो तशा या गोष्टी आगीसारख्या भरभर पसरत जातात . शेवंताच्या आणि पाद्रीच्या बाबतीत असेच झाले. लोक शेवंता च्या बाबतीत नाही नाही त्या गोष्टी बोलू लागले .

“ सर्वांदेखत पाद्री शेवंताच्या हाताचे मुके घेतोय असे मग सगळ्यांच्या डोळ्यामागं काय काय होत असेल देव जाणे “ लोक म्हणायचे . गावाला चगळायला एक चवदार विषय मिळाला होता . काही झालं तरी शेवंता पाटलाची पोरगी होती , मागं कोणीही कितीही वाईट वंगाळ बोललं तरी पाटलांसमोर बोलायची हिम्मत कुणाची नव्हती . मात्र अशा गोष्टी फार काळ लपून राहत नाही एक दिवस ही गोष्ट पाटलाला कळालीच . तेव्हापासून म्हणे पाटलाने शेवंताला पाद्रीला भेटायची मनाई केली . पाद्रीलाही चांगलाच चोप दिला . मात्र शेवंताला हे सारं सहन न झाल्यामुळे तिनं चर्चा पुढे जाऊन फास घेतला.

पोरीन फास घेतल्यामुळे पाटील चांगलाच पिसाळला त्याने पाद्रीचा चर्चमध्येच खून घडवून आणला सारा गाव जो या लफड्याला नावं ठेवत होता तोच या दोघांसाठी हळहळून रडू लागला . पाटलाच्या नावानं खडे फोडू लागला . त्याला शिव्या घालू लागला . शेवंता आणि पाद्रीच्या प्रेमाला लैला-मजनू , हीर-रांझा, बाजीराव-मस्तानी यांच्या प्रेमाच्या उपमा देऊ लागला पाटील यांच्या दृष्टीने खलनायक झाला . पाटील खलनायक झाला खरा मात्र याच खलनायकाचा पाद्र्याच्या भुताने भयानक अंत केला . लोक म्हणू लागले पाटलाला चांगला धडा मिळाला मात्र त्याच बरोबर त्या वाटेवर जायलाही भिऊ लागले

या साऱ्या गोष्टींमुळे ज्या बाजूला छोटखाना चर्च होता त्या बाजूच्या या वाटेला पाद्र्याची वाट असे नाव पडले . आणि त्याच वाटेवरून गन्या मन्या आणि राम्या जायला निघाले होते.
  दिवसाउजेडी माणसाने कितीही फुशारकी मारली की आपण कशाला भीत नाही भूत असो नाहीतर काहीही असो मात्र रात्री अंधार पडल्यावर साऱ्यांचीच बोलती बंद होते . गण्याने कितीही मोठ्या बाता मारल्या असल्या तरी त्याच्या अंतर्मनात कुठेतरी भीती आपले पाय पसरवत होती.
पाद्र्याची वाट ही काही वर्दळीची वाट नव्हत गाडीवाट असली तरी चाकाच्या 2 चाकोरीपुरतीच वाट राहिली होती बाकी सगळीकडे रानटी झाडे झुडपे माजली होती त्यामुळे जंगलात आल्यासारखं वाटत होतं . पायाखालचं वाळून गेलेलं गवत पाय पडल्यावर चुरचुर करत होतं . सुरुवातीला या जंगलात फिरताना राजेशाही असणारी त्यांची चाल थोड्याच वेळात दीनदुबळ्या माणसासारखी झाली. काही वेळाने शिकार शिकारीपासून जीव वाचवून पळण्यासाठी जशी धडपड करते त्याहून अधिक धडपड हे तिघे त्या जंगलातुन बाहेर पडण्यासाठी करू लागले . कुठेतरी कोल्हेकुई व्हायची आणि त्यांची काळीजं झटकन उडायची . मग काही काळ शांत जायचा पायाखाली असणाऱ्या गवताच्या चुरचुरी चा आवाज इतका भयानक वाटायचा की कानाचे पडदे फाटायचे . तरीही धीर करून ते चालले होते त्यांच्या मनात कुठेतरी लपून बसलेला विचार म्हणत होता की भुते वगैरे काही नसतात सारे भास असतात पण……….।
तो विचार किती खरा आणि किती खोटा या सार्‍यांपेक्षा सहीसलामत बाहेर जाणे अधिक महत्त्वाची होती इतकावेळ विचारांच्या तंद्रीत चालणाऱ्या भानावर येत मन्या व राम्याला हाका मारल्या त्याचा आवाज त्या निस्तब्ध जंगलात कुठच्या कुठे हरवून गेला. त्याच्या हाकेला उत्तर न आल्याने त्याने मागे वळुन बघीतले तर………….
       
                तिथे कोणीच नव्हतं . तो एकटाच चालत होता …. कधीपासून …?केव्हापासून …? त्याला काहीच माहित नव्हत.त्याला काहीच कळत नव्हत . तो घाबरला. गुरासारखा ओरडत मान्या राम्या त्यांच्या नावाने हाका मारत सुटला . थोडाच वेळ पण थोड्या वेळानंतर तो ओरडला खूप ओरडला पण त्यालाही स्वतःचा आवाज ऐकू येईनासा झाला . त्या अघोरी जंगलाने त्याच्यावर ती कोणती करणी केली होती कोणास ठाऊक ….?
   


          तो वेड्यासारखा धावत सुटला इकडून तिकडे तिकडून इकडे धाप लागेपर्यंत तोंडाला फेस येईपर्यंत तो धावतच होता पण तो कुठेच पोहोचत नव्हता फिरून फिरून एकाच जागी येत होता.

तो घाबरला खूप घाबरला मृत्यू दारावरती दिसल्यावर मृत्यूचा पाश जीवनवृक्षाचा रस संपूवू लागल्यावर सगळेच घाबरतात आणि हाच घाबरट पणा हीच हीच मूर्ती पासून ची भीती सामान्य माणसाकडून अचाट कामे करून घेते मृत्यूपूर्वीच असच बळ त्याच्या अंगी संचारला त्याला राग आला त्या जंगलाचा , त्या पाद्रीचा , त्याच्या प्रेमात पडणार्‍या शेवंताचा , दोघांच्या मिलनाचा अडथळा बनणाऱ्या पाटलाचा ही.



        त्याच रागाच्या भरात त्यानं एक अचाट धाडस केलं .
जंगलातील वाळलेली लाकडं गोळा केली , पालापाचोळा गोळा केला , त्यांचा ढीग लावला आणि खिशात हात घातला पण आगपेटी नव्हतीच . तिथेच पडलेले दोन गारगोटीचे दगड घेतले आणि एकमेकांवर आपटणे सुरू केले . त्याला कशाचेच भान नव्हत एकाच गोष्टीवर त्याचं लक्ष होतं ती म्हणजे जंगल जाळायचं……। गारगोटीवर गारगोटी आपटता आपटता त्याच्या डाव्या हाताचा अंगठा ठेचून निघाला त्याच्यातून रक्त वाहू लागलं पण त्याला कशाची जाणीव नव्हती गारगोट्या संघर्ष वाढत होतं नि शेवटी त्यातून ठिणगी उडाली ती पाल्यावरती पडली आणि एकच भडका उडाला …..।
          जाळ लागल्याबरोबर ओली वाळली सगळी लाकडे आगीच्या कचाट्यात येऊ लागली. त्याचबरोबर आजूबाजूचे वृक्ष-वेली सगळेच आगीने आपल्या बाहुपाशात आजूबाजूला घेतले . सगळीकडे नुसती आग झाली . आगीच्या ज्वाला त्याच्या शरीराला स्पर्श करू लागल्या आगीचा दाह आता प्रकर्षाने जाणवू लागला ….। हळूहळू तोही यज्ञामध्ये पडलेल्या आहुतीप्रमाणे अग्नी मध्ये जळू लागला . मृत्युलाही भीती वाटावी इतकी भयानक वेदना त्याला होऊ लागली पण वेळानंतर सारे काही शांत झाले .

      त्याला काहीच कळेना तो कोठे होता तिथे काहीच नव्हते त्याला काहीच दिसत नव्हते त्याला काहीच जाणवत नव्हते फक्त मोकळं आणि हलकं जाणवत होतं हाच असतो का तो मृत्यू ज्याला आपण भित असतो पण यात भिण्यासारखं काहीच नाही…।

         हळू हळू त्याला शीतल पाण्याच्या तुषारांचा गारवा जाणवू लागला आणि गारव्याबरोबरच अनेक आवाज त्याच्या कानात गर्दी करू लागले…..।
       मन्या आणि राम्या त्याला उठवत होते . तो बेशुद्ध झाला होता हळूहळू त्याने डोळे उघडले त्याला जाणवले आपण जिवंत आहोत .

       मग ते जंगल ती आग हे सगळं खोटं होतं का ? तेव्हाच त्याच्या हाताच्या अंगठ्याला असह्य वेदना झाल्या , हे सारं खरं होतं तर …? मग तो वाचला कसा ? कुणी वाचवलं ? पद्र्याच्या भुतानं यांना काहीच केलं नाही का ….?
तो एका झोपडीत होता . झोपडी यासाठीच म्हणायचं कारण ती लाकडाची होती पण एकदम आलिशान होती . तो एका लाकडी पलंगावर खोलीच्या एका बाजूला होता . त्याला लागूनच एक लाकडी कपाट होतं, त्याच्यावर अतिसुंदर वर्तुळाकार आरसा होता. त्यावरून खोलीतील दिव्याचा प्रकाश परावर्तित होऊन खोलीभर पसरला होता . खोली सुंदर सजवली होती .

“ आयला रम्या आपल्या काटेवाडीच्या जंगलात असला बंगला हाय ते आपल्याला कसे माहीत नव्हते रे “ गण्या शुद्धीवर येत म्हणाला. आम्हाला तर कुठे माहीत होतं तेवढ्यात समोरचं दार कुरकुरीत उघडू लागलं . तिघेही प्रतिक्षिप्त क्रिये मुळे भलतेच जास्त सावध होत आक्रमक पवित्र्यात आले.
“ अरे घाबरू नका मीच आहे “ एक इसम आत येत बोलला. राम्या व मान्या त्याच्याकडे बघत परिचयाचे हसले . “ तुम्ही आहात होय आम्हाला वाटलं ते पाद्र्याचं भूत आहे ” गणाच्या तोंडावर प्रश्नचिन्ह बघून राम्या म्हणाला त्यांनीच आपल्या सर्वांना वाचवलं आहे नाही तर आपलं राम नाम सत्य झालं असतं ..
गण्या उठून बसत म्हणाला “ कोण आपण ? “ क्षणभर विचार करून शांतपणे तो इसम म्हणाला ” मीच तो पाद्री “ तेव्हा तिघांचीही भीतीने गाळण उडाली. तिघेही भेदरलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहू लागले . इतकावेळ मराठमोळा वाटणारा त्याचा वेश हळूहळू पालटू , लागला त्याच्याभोवती त्याला झाकून टाकणारे छोटे-छोटे काळसर ढग जमू लागले. मग दोन-तीन सेकंद तो पूर्ण अंधारात गडप झाला .

त्याच्यांंपुढील खुर्चीत बसत तो म्हणाला “ I am the Priest of this Church “ त्याचा पोषाख पुर्ण बदलला होता . पाद्री लोकं घालतात तसा पायघोळ झगा घातला होता . गळ्यात क्रूस होता आता तो एक इंग्रजी पादरी वाटत होता. त्याचं इंग्रजी तर यांची खात्रीच झाली की हेच त्याचं भूत . पुन्हा एकदा ते मृत्युच्या दाढेत अडकले होते . अशा गंभीर परिस्थितीतही राम्या त्याला म्हणाला की “ मग तुम्ही एवढं चांगलं मराठी कसं काय बोलू शकता ? “ हा प्रश्न ऐकून पादरी जो हसत सुटला तो थांबेचना . “ अरे मी भुत आहे आणि तसंही मला मरण या अगोदरच मराठी येत होतं “

मग गण्या म्हणाला “ आम्हाला मारलं कसं नाही “
“अरे काय रे भुतांना माणसाला त्रास देण्याशिवाय दुसरी कामे नसतात असं तुम्हाला वाटतं काय ”
“ नाही तसं नाही तुम्ही लई जणांना मारलं म्हणून म्हटलं “
“ मी फक्त पाटलाला मारलं कारण त्यान मला शेवंताशी लग्न करून दिले नाही म्हणून “
“ मग तिथंन पुढं. माणसं मरायला चालू झाली त्यांना कोणी मारले “
“ जंगलात चालते ती सारी पाटलाच्या भुताटकीची करामत आहे “
“ काय “ ते तिघेही चाटच पडले.
“ आतातर तुम्ही एक नमुना बघितला राम्याला झाडांनी व वेलींनी धरून स्वतःमध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न केला तरं मन्या जमीनी गिळण्याचा प्रयत्न केला आणि गण्याला आगीने आपले भक्ष्य बनवण्याचा प्रयत्न केला “
“ मग तुम्ही आम्हाला का वाचवलं ? “
“ मग काय मरू द्यायचं होतं की काय ? “
“ पण पाटील तर मेला आहे ना आणि त्याच भूत कुणी बघितलंय “
मी सगळं सुरुवातीपासून सांगतो काय झालं ते त्या पाद्रीने सांगायला सुरुवात केली ……

प्रेम ही अशी गोष्ट आहे जी भल्याभल्यांना वेड करते . प्रेमासाठी माणूस काहीही करायला तयार होतो . माझेही शेवंता वरती प्रेम होतं . तिच्यासाठी मी काहीही करायला तयार होतो . अगदी काहीही म्हणून तर मुंबईमधील चांगली प्रोफेसरची नोकरी सोडून मी इथे आलो असतो . हो मी मूळचा पाद्री नाही आणि मी शेवंताच्या प्रेमात गावात आल्यावरती पडलेलो नाही . मी मुंबईत त्याच कॉलेजमध्ये शिकवायला होतो जिथे शेवंता शिकायला होती. तिथेच आमची ओळख झाली , ओळख मैत्रीत,आणि मैत्री प्रेमात बदलली . आम्ही दोघे एकमेकांवर खुप प्रेम करायचो .

एक दिवस मी तिला लग्नाची मागणी घातली . तिला अनपेक्षित नव्हते ,

ती म्हणाली मी तर केव्हाच तुझी झाली आहे पण….

पण काय मी म्हणालो

बाबा परवानगी देणार नाहीत

मी येईन त्यांची समजूत काढून

अरे जरी माझ्या प्रेमापोटी माझ्या बाबांनी परवानगी दिली तरी समाज हे स्वीकृत करणार नाही बाबा एकटे पडतील
पाद्री सांगत होता

मधेच राम्या म्हणाला मूर्ख मुलगी ..
या मुली अशाच असतात
त्यांना सांगायला पाहिजे
हमको मिटा सके ये जमाने में दम
नही हमसे जमाना खुद हे
जमाने से हम नही

तुमचं चालू द्या पुढे त्याच ब्रेकअप झाल्यापासून तो जरा पिसाळल्यासारखे करतोय मन्या आवेशाने उठलेल्या राम्याला बसवत म्हणाला

म्हणून मग मी ठरवलं तिच्याबरोबर गावात यायचं पण प्रोफेसर म्हणून आलो असतो तर कुणी ढुंकूनही पाहिलं नसतं त्यातून मला गाववाल्यांची ही सहानुभूती पाहिजे होती पाद्री झालं की machinery तर्फे खर्चही झाला असता धर्म प्रसारही झाला असता गाववाल्यांची सहानुभूतीही मिळाली असतील आणि माझं लग्नही झालं असतं

अरे वा एका दगडात चार पक्षी मारले की हो तुम्ही मन्या म्हणाला

बाकी काही होऊद्या अथवा न होऊ द्या पण लोकांची सहानुभूती तुमच्याकडेच आहे बरं का …
मन्या म्हनाला

पाद्री होऊन यायच्या ऐवजी लाल कपडे काळी टोपी वाले साहेब होऊन आला असता तर सगळं काम सोपं झालं असतं की …

गण्या म्हणाला

अरे एवढा मोठा नव्हतो रे मी पाद्री म्हणाला
तो पुढं सांगू लागला

असो गावात आलो नि तिचं आणि माझं भेटणं वाढलं . गावभर चर्चा चालू झाली म्हणलं ही योग्य वेळ आहे आत्ताच पाटलाला शेवंताची मागणी घालू पण झालं उलटंच .

मी मागणी घातल्यावर त्याने शेवंताचा बाहेर पडणं बंद केलं . माझ्या वरही दोन-तीन वेळा हल्ले केले . म्हणून मी दोन चार दिवस लपून बसलो . एक दिवस माझ्या कानावर आलं की शेवंताने चर्च पुढं फास घेतला म्हणून मी आलो . तर शेवंता गेलीच नव्हती . ती जिवंत होती तिला चर्चमध्ये डांबून ठेवलं होतं दुसऱ्या कुठल्यातरी पोरीचा पाटलाने अंतिम संस्कार केला होता आणि गावभर बातमी पसरवली की शेवंतान फास घेतला .

“ पण तसं का केलं त्यानं “ आम्ही विचारलं
अरे शेवंताने त्याचं नाक कापलं होतं ना..
मग मी आल्यावर तिच्या देखत माझा खून केला
अन तिचं काय झालं

त्यांनी तळघरात डांबून ठेवलं रे माझी शेवंता मी गेल्यावर सुद्धा यातना भोगत होती . आयुष्याचं वाटोळं झालं रे तिच्या कुणीतरी उमललेलं एखादं फूल गाडून टाकावे तसं तिच्या आयुष्याचं झालं . ती रडत होती माझ्या आठवणीत आणि मी काहीच करू शकत नव्हतो . कारण मी जिवंत नव्हतोच भूत होतो . तिला त्या अंधाऱ्या खोलीत त्रास भोगावा लागतोय पण मी काहीच करू शकत नव्हतो . मी हतबल होतो फक्त भटकत होतो तिच्या वेदना पाहत होतो , तिचे दुःख अनुभवत होतो , मला तिचं कौतुक वाटायचं की हा सारा की कसा सहन करू शकते पण ती…. तिने स्वतःला अजून त्रास करून घ्यायला चालू केलं.. तिने अन्न त्याग केला . तिचं शरीर हळूहळू क्षीण होऊ लागलं . मला तिचा मृत्यू दिसू लागला पण तरीही मी काहीच करू शकत नव्हतो . एक दिवस आला ती सदा सर्वदा साठी मुक्त झाली. आणि माझ्यातील क्रोधाने पाटलाचा अंत केला . शेवंता बिचारी स्वच्छ मनाची मृत्यू पावताच मुक्त झाली पण मी ..
मी अजूनही हा त्रास का बघतोय का ? का ? आणि कशासाठी ? त्या परमेश्वराला माझी दया का येत नाही ? का तो मला या बंधनातून मुक्त करत नाही ?
पादरी भावूक झाला होता त्याच्या डोळ्यातून आसवे वाहात होती कोणालाच कळेना की काय करायचं ?

    पाद्रीला अश्रू अनावर झाले तो मुसमुसत रडू लागला .. त्याचं दुःख खरंच मोठं होतं . तो किती वर्षे असा भटकत होता काय माहित ? एवढ्या वर्षाचा एकांत ? कितीही मोठा गुन्हा असला तरी ही शिक्षा फारच मोठी होती . देव त्याला ही शिक्षा कोणत्या गुन्ह्यासाठी देत होता काय माहित  ?

“ तुम्ही स्वतःला आवरा , याच्यावर ती काही ना काही उपाय असेलच “ गण्या म्हणाला

“ नाही मला शतकानु शतके असंच राहावं लागेल, नरक यातना म्हणतात त्या याच असाव्यात “ पादरी भावूक होऊन म्हणाला

  “प्रत्येक गोष्टीचं उत्तर  असतं ,या अडचणीतून ही काही ना काही मार्ग सापडेलच “गण्या म्हणाला

  “ आहे एकच उपाय आहे “ पादरी म्हणाला

“ कोणता ? “ तिघेही एकदमच ओरडले.

“  मी हे कसं सांगू शकतो ? मी एवढा स्वार्थी कसा होऊ
शकतो ? “ पादरी मधूनच वेड्यासारखं बडबडू लागला

“ सांगा ना कोणता उपाय “ राम्या म्हणाला

“ अरे मी तुम्हाला कसा त्रास देऊ शकतो “

“आम्हाला सांगा , नक्की काय म्हणताय तुम्ही  ? “

“ मी किती आंधळा झालो स्वहितासाठी दुसऱ्याच्या अन्हीत  करायला निघालो !!’

“ अहो सांगा तरी एकदा कोणता उपाय आहे ?”

“ सांगतो माझ्यासाठी कोणत्याही जिवंत तीन व्यक्तींनी स्व इच्छेने दोन थेंब रक्त सांडलं तरच माझी मुक्तता होऊ शकते “

“ फक्त दोन-तीन थेंब रक्त आम्ही बाटली बाटली  रक्त दान करतो “

“  तसं नाही पण माझ्यासाठी तुम्हाला उगाच त्रास कशाला “

“ आहो दोन-तीन थेंब रक्ताने तुमची मुक्तता होणार असेल तर ते काहीच नाही “

“ पण तुम्हाला एक मंत्र म्हणावा लागेल”

“ म्हणजे ओम फट स्वाहा यासारखा “
“ नाही नाही तसं नाही अगदी अंतर्मनातून म्हणा की हे मी माझ्या स्वतःच्या इच्छेने देत आहे”

“ इतकच अण्णा तो चाकू इकडं  “ गण्याने चाकू घेत हाताला एक रेष मारली व त्यातून रक्त प्रवाह होऊ लागला

गण्या म्हणाला  “ हे रक्त मी स्व इच्छेने देत आहे ”

   मन्या आणि राम्याने ही तसेच केले दोन-तीन थेंब पडले तसे आसपासचं जग पाण्यात रंग विरघळावे तसे विरघळु लागलय . तो पादरी , तो चर्च किंवा बंगला त्यांचे मित्र आणि बाकी सारं विरघळून गेलंय . उरला फक्त अंधार ,घनदाट अंधार , काळा अंधार . काळोखात दूर कूठेतरी प्रकाशाची शलाका चमकली अंधकारात सर्वत्र पांढराशुभ्र प्रकाश पसरू लागला .  बरोबरच एक मंद सुगंध आसमंतात भरून राहिला . त्या सुगंधा बरोबर  एक सुकोमल मधुर आवाज , किती सुंदर ऐकवत राहवा असा आवाज . काही कळत नव्हतं तो आवाज काय पुकारतोय पण किती छान वाटत होतं ऐकायला . हळूहळू कळू लागलं

“  गणेश गणेश उठ नारे !
“ गणेश अरे गणेश….

   गाण्याचं नाव एवढ्या चांगल्या प्रकारे पुकारलं जाऊ शकतं याचं गाण्याला अप्रुप वाटू लागलं. आणि भानावर येत डोळे उघडले . त्याच्या डोळ्यासमोर एक अत्यंत सुंदर स्त्रीचा चेहरा होता कशासारखा चेहरा चेहरा दिसतोय याचा विचार न करता ,  त्या चेहऱ्याची सुंदरता पाहण्यात त्यानं मन गुंतवलं . त्या मुखड्याचे सौंदर्य त्यांनं काळजात साठवून घेतलं . ती त्याला काहीतरी सांगत होती , ते त्याला काहीच कळत नसलं तरी तिच्या ओठांची होणारी हालचाल त्याला मोहक वाटत होती . बोलताना चेहऱ्यावर येणारे केसाची बट हळुवार पणे मागे सारणारी तिचे कोमल हात सारे काही सुंदर होते . तो सुंदरतेचा आस्वाद घेत होता
गण्याला आजूबाजूच्या परिसराची जाणीव झाली .त्याच्या आजूबाजूला कोणीच नव्हते .तो एकटाच होता.  तो त्या घरातही नव्हता.  तो बाहेर होता . जंगलात आणि एकटाच .
पण तरीही त्याला भीती वाटत नव्हती एक वेगळीच सुरक्षिततेची भावना मनात होती. ती सुंदर मुलगी तिथे दिसत नव्हती . त्याने इकडे तिकडे पाहीले , पण ती कुठेच नव्हती. तेव्हाच आवाज आला....

        " गणेश लक्ष देऊन ऐक तुझं नि तुझ्या मित्रांचं आयुष्य तुझ्या वरती अवलंबून आहे .  तुला जर जगायचं असेल तर मी सांगते तसं कर....

   " कोण ,  कोण ? आहात तुम्ही आणि कुठे आहात ...?

   " ते सांगायला माझ्याकडे वेळ नाही . मी सांगत आहे तेवढं एक ,  नाही ऐकलं तर तुझा मृत्यू निश्चित आहे .

   "   हे जे तू पाहत आहे ते स्वप्न आहे .;जेव्हा तू जागा होशील तेव्हा त्याच घरात असशील .तुझ्या मित्रांना तुला शुद्धीवर आणावं लागेल . आणि जेवढं लवकर शक्य होईल त्या घरातून बाहेर पडावं लागेल . घरातून बाहेर पडताना तेथील भांड्यावर झाकण ठेवायला विसरू नको . आणि बाहेर पडल्या नंतर पिवळ्या कंदिलाच्या मागे जा .तो कंदील तुला जंगला बाहेर जाण्याची वाट दाखवील . जर तु घाइ केली नाहिस तर तुझा मृत्यू निश्चित आहे "


     मृत्यू निश्चित आहे .... हेच वाक्य त्याच्या कानात मध्ये घुमत राहिले नि तो  शुद्धीवर आला . एक भयानक दुर्गंधी त्याच्या सभोवताली भरून राहिली होती . कुजलेल्या मासाची . त्याला ठसका लागला . तो उठू लागला तसं त्याला चक्कर आल्यासारखं जाणवलं .  त्याच्या हातातून संततधार लहानसा रक्तप्रवाह सुरूच होता . तो प्रवाह विचित्रपणे वाहत होता . हातातून ठिबकणारा रक्ताचा थेंब जमिनीवरती पडतच नव्हता . तो थेंब हवेतूनच वाहत जात , तिथेच ठेवलेल्या एका भांड्यामध्ये जमा होत होता , त्याने खिशातून रुमाल काढून हाता भोवती बांधला . मन्या व राम्या बेशुद्ध होते . त्यांच्या हातातून तो रक्तप्रवाह तसाच वाहत होता .

         
             त्याने मन्याला व राम्याला उठवायचा प्रयत्न केला पण दोघेही शुद्धीवर येत नव्हते . त्याने पाण्यासाठी शोधाशोध सुरु केली तिथे कुठेच पाणी नव्हते . मग तो बाहेर गेला आणि त्याला पाण्याचे डबके सापडले . त्याने तेथील पाणी आणून त्याच्या तोंडावर शिंपडले आणि मन्या शुद्धीवर येत हलचाल करू . पण राम्या अजूनही बेशुद्ध होता .

" काय झालं गण्या एवढा कसं काय
भेलेला आहे ? "  शुद्धीवर येत मन्या म्हणाला

गण्याने घडलेला सर्व वृत्तांत मन्याला सांगितला.

" म्हणजे पाद्री आपल्याशी खोटं बोलला की काय  ..?
पण खोटं बोलून त्याला काय मिळणार आहे . मारायचं असतं तर त्याने आपल्याला तेव्हाच मारलं नसतं का .? " मन्या गण्याला म्हणाला.

     " जरा तुझ्या हातात कडे बघ रक्त कसं उडत आहे . ही काही तरी बेकारच भुताटकी दिसत आहे . पटकन काहीतरी बांध हाताला ." गण्या म्हणाला

  "  हाताला बांधून काही उपयोग नाही गण्या . बघ जरा तुझ्या हातात कडे बांधलेल्या रुमालामधून सुद्धा रक्ताचे थेंब त्या भांड्याकडे जात आहेत ... .."
       गण्याने हाताला रुमाल बांधून देखील त्या रूमलातुन रक्त ठिपकत होते व त्या भांड्याकडे जातच होते .जरी रूमलातुन रक्त ठिपकत होते तरीही त्या रुमालाला एक थेंबही रक्त लागलेले नव्हते . तो पांढरा शुभ्र होता .

  आठव तिने अजून काहीतरी सांगितलं असेल . गण्याने आठवून पाहिलं तरीही त्याला काहीच आठवेना .

" काय सुद्धा आठवत नाही लागा ..."
 
     तेव्हाच एक विचित्र आवाज तिथे घुमू लागला .
घुं ss घुंss ..... दोघांच्याही पोटात भीतीने गोळा आला . राम्या अजून बेशुद्धच होता . काहीतरी करायलाच पाहिजे होतं . मन्या तावातावाने त्या भांड्याकडे गेला . ते भांड त्याने आदळून आपटलं . ते काचेचं असल्याने तुकडे झाले आणि रक्ताचे शिंतोडे सर्वत्र उडाले .  एका भयानक दुर्गंधीबरोबर एकाच वेळी कितीतरी जणांची रडल्याचे , ओरडण्याचे , प्राणांतिक किंकाळ्यांचे आवाज येऊ लागले , आणि या साऱ्यांच्या पार्श्वभूमीला मघाशीचा घुं घुं घुत्कार होताच .

     2 सेकंदात असं काहीतरी घडून गेलं की ते दोघालाही कळालं नाही . ते भांड होतं तिथेच होतं . तुकडे झालेलं भांडण पुन्हा जुळालं कसं?  सर्वत्र उडालेले रक्ताचे शिंतोडे गायब झाले होते .  ते रक्त आहे तसं भांड्यात जमा झालो होतं . घुं ss घुंss चा घुत्कार सोडला तर बाकी सारे आवाज बंद झाले होते . गण्याला व मण्याला अजून बऱ्याच ठिकाणी अजून जखमा झाल्या होत्या .

  गण्या मधूनच ओरडला " आठवलं "
 
      व त्याने तिथेच ठेवलेल्या झाकण भांड्यावर ती झाकून टाकले . तेव्हा त्यांच्या हातातून ठिबकणारे रक्त बंद झाले . कोणीतरी त्यांच्या शिकारीला आलं होतं घुंss घुंss चा आवाज कानाचे पडदे फाडत होता . त्यांनी दोघांनी राम्याला उचललं . ते पटकन घराबाहेर पडले . पण घरातून येताना राम्याच्या हाताचा धक्का लागून ते झाकण खाली पडले . मात्र त्या दोघांनाही ते  कळालं नाही .

         
      घरा बाहेर पडल्यानंतर त्यांना समोरच पिवळी मशाल दिसली त्या मशालीच्या मागे ते दोघेही निघाले . पण गन्या विसरला की त्याला कंदिलाच्या मागे जायचे होते जो उजव्या बाजूला थोड्या लांब अंतरावर होता .
.
   मन्या व गण्या राम्याला घेऊन जात होते .त्या मशालीच्या पाठोपाठ . राम्या अजूनही बेशुद्ध होता . त्यामुळे दोघांनी मिळून राम्याला उचललं होतं . राम्याच्या ओझ्यामुळे त्यांची चाल मंदावली होती . मशाल असली तरी तिचा थोडा थोडका प्रकाश काळोखात हरवून जात होता . त्यातच वाटही व्यवस्थित नसल्याने सारखे धड-पडत होते दोघेही . ठेच लागून त्यांच्या पायाला जखमा झाल्या होत्या . खोलीतून येताना भांड्याचं झाकण खाली पडलं होतं .  त्यामुळे अजूनही थोडं थोडं रक्त उडत-उडत जाऊन तिथे पडत होतं . मात्र याची जाणीव त्यांना अजिबात नव्हती . त्यांना फक्त एवढंच वाटत होतं की आपण येथून बाहेर पडणार.....।

"  गन्या लगा तुझ्यामुळे आपण इथं फसलो , नाही तर लागा आतापतुर आपण ऑर्केस्ट्रात धमाल मस्ती करून घरी झोपलो असतो .....

"  मन्या लगा मला तर काय माहित असं काय असेल म्हणून..

       मात्र अचानक पुढे असलेली मशाल गायब झाली .  दोघांच्याही काळजाचा ठोका चुकला . इतका वेळ उजेडाला सरावलेले डोळे अचानक आलेल्या अंधारामुळे काही सेकंदासाठी आंधळेच झाले .  मग हळूहळू थोड्या अंतरावर जत्रेसाठी लावलेले दिवे , गावातील घरातील प्रकाशाचा झगमगाट दिसू लागला आणि त्यांना हायसे वाटले . त्यांनी आपला वेग वाढवला व पटापट गावाकडे सरकू लागले .  त्यांच्या जीवात जीव आला .  त्यांनी  देवाचे व त्या मुलीचे जिने स्वप्नात येऊन मार्ग दाखवला ,दोघांचेही मनापासून आभार मानले.

       आता त्यांची खात्री पटली होती की भूत नावाची गोष्ट असते व त्याची भीती कितीही नाही म्हटलं तरी आपोआपच वाटते . पण आता ते सुरक्षित होते  . जंगलातून बाहेर आल्यावर समोरच थोड्या अंतरावरती देऊळ होते . तिथेच बाजूला बसायला एक कट्टाही होता . त्याच कट्ट्यावर त्यांनी राम्याला झोपवले व दोघेही बसले.

"  मन्या जा रं  चांगलं बादली भरून पाणी आण,  कसलं बेशुद्ध झालयं राम्या , त्याला शुद्धीवर आणायला पाहिजे .

" थांब गण्या .  दोन मिनिटात आणतो .

     मन्याने पाणी आणल्यावर त्याचा सपकारऱ्याने राम्याच्या तोंडावर मारले . तेव्हा राम्या शुद्धीवर आला .

गण्या म्हणाला  "लेका राम्या तुला माहित हाय का आपण कसलं बेकार भुताच्या तावडीत सापडलो होतो .."

राम्या " पण पाद्री तर चांगलं भुत होत होतं ना
         मुक्त झाला का ती पाद्री...."

मण्या  " अरे कसला मुक्त होतोय तो . त्याचाच डाव होता   सारा . दोन थेंब म्हणून किती रक्त काढलं बेशुद्ध करून कुणास ठाऊक  ? "

राम्या  " पण त्याला मारायचं तर त्यांना तेव्हाच आपल्याला मारलं नसतं का ? बेशुद्ध करून रक्त काढायचा काय उपयोग ?? "

गण्या " काय माहित काहीतरी प्रथा असेल बळी द्यायची वगैरे "

राम्या " अरे पण मग आपण वाचलो कसे ? "

मण्या " अरे गाण्याच्या स्वप्नात एक पोरगी आली बेशुद्ध असताना तिने सांगितलं काय करायचं ते ."

राम्या " कुठली पोरगी ?

गण्या " ते मला पण माहित नाही पण तिनं सांगितलं तसं केलं म्हणूनच आपण वाचलो . "

राम्या " गण्या रुमाल कशाला बांधलाय हाताला काय लागलं का काय ? "

गण्या " अरे बाबा काय सांगायचं तुला रक्ता वरती सुद्धा भुताटकी चालत होती रक्त हवेत उडत होतं .."

मण्या " गण्या जरा नीट बघ अजून पण रक्‍त पडतेच आहे..

      अजुनही रक्त वाहत होतं जंगलाच्या दिशेने.

मन्या म्हणाला " पण ते कसं काय शक्य आहे ? आपण तर गावात आलो ना ?  जंगलाच्या बाहेर "

राम्या म्हणाला " आपण कोणीतरी जाणकार माणूस गाठायला पाहिजे "

गण्या म्हणाला " आपण गावात आलोच नाही . गावात देऊळ कधी रिकाम नसतं . दोन-चार म्हातारी बारा महिने पडीक असतात देवळात . पण आता कोणीच नाही . "

" होय लगा आज ऑर्केस्ट्रा आहे पण कुठल्याच गाण्याचा आवाज येत नाही " मन्या म्हणाला

" अरे ती गोष्ट सोड कुत्रा , मांजर , किडा-मुंगी काय तरी दिसतय का तुला ..? " राम्या

  " अरे तुम्ही सगळं सोडा रातकिड्यांची किरकिर सुद्धा ऐकू येत नाही . किती विचित्र आहे ...? " गण्या म्हणाला

" गण्या , मन्या दोस्तांनो ही चकवा तर नसेल ना चकव्यातून बाहेर कधीच जाऊ शकत नाही माणूस " राम्या

" चला आपण देवळात जाऊन मग कुठलं भुत देवळात येतंय ? " मन्या

" अरे येडाय काय तू ? ही  देवळपण भुतानाचं बनवलेलं असणार ...? " गण्या

राम्या म्हणाला "  मग आपण करायचं तरी काय ? आपण वाचणार तरी कसं ?  "

           पण अचानक कोलाहाल वाढला . चित्र-विचित्र आवाजा बरोबर अनेक मितीमध्ये अनेक घडामोडी सुरू झाल्या . पण त्यांच्या मानवी डोळ्यांना एवढंच दिसत होतं की सारे काही नष्ट होत होतं . व त्यांच्याकडे गोलाकार आकारात मध्ये येत होता तो काळोख , मिट्ट काळोख . तो काळोख त्यांच्याभोवती  गोलाकार पसरत गेला होता . तो काळोख , त्यात काय होतं काय माहित ?  पण जे काही होतं ते अमानवी , पाशवी आणि क्रूर होतं . जी काही शक्ती होती ती मानवी डोळ्यांना , मनाला , बुद्धीला न समजणारी होती . जे काही त्यांच्या मानवी ज्ञानेंद्रियांना जाणवत होतं ते त्या शक्तीचा थोडासा भाग होता . ज्याच्या पुढे मानव हतबल होता .  इतका वेळ पुढे सरकणारा तो  गोलाकार काळोख थांबला . कोलाहलाचा स्वर उच्च कोटीला पोहोचला . कोणतही हिंस्र श्वापद शिकारीला खाण्यापूर्वी मौज म्हणून तिच्याशी खेळ करते तोच खेळ आता त्या तिघांबरोबर होणार होता .

          काळोखातून चित्र-विचित्र गलिच्छ स्वर उमटत होते . जे तिघांच्याही कानाला कर्णकर्कश्य वाटत होते . जो प्रसंग तिघांवर ओढवला होता तो अकल्पनीय होता . अचानक काळोखातील आवाज थांबला व त्याच बरोबर त्यांच्या आजूबाजूला एक भयानक दुर्गंधी पसरली . थंडी हळूहळू वाढू लागली व त्यांचे दात कडकडू लागली . नक्कीच काळोखातून कुणीतरी पुढे आलं होतं .  त्यांच्यासोबत खेळ करण्यासाठी . आता हे शिकार करणार होतं . शिकारी ची मजा घेणार होतं .  तिघांनीही एकमेकांचे हात घट्ट पकडले .  त्यांना समोर एक भयानक ,  क्रूर ,  निर्घुन , बिभत्स  मृत्यू दिसत होता . एक वेळ मृत्यू बरा पण हा अघोरी नरक होता .  मृत्यू नंतरही अमर्याद काळासाठी दास्यत्व व भयानक वेदना.

भयानक शांतता जीवघेणी होत होती . त्यांच्या काळजाच्या ठोक्याच्या आवाजाने सुद्धा ते घाबरत होते . अचानक गण्याच्या हाताला हिसका बसला . त्याने पाहिलं राम्या काळोखाकडे खेचला जात होता .

  " मन्या राम्याला ओढ  "

   मन्या जागचा हलला नाही . त्याच्यापर्यंत आवाज पोहोचला नाही .  तो स्तब्ध होता . एकाच अवस्थेत , पुतळ्यासारखा ,  आणि राम्या हवेत खेचला जात होता त्या काळोखाकडे . राम्याला मृत्यू समोर दिसत होता तो जिवाच्या आकांताने किंचाळत होता , ओरडत होता , वाचवा म्हणत होता पण एकटा गण्या काय करू शकत होता ?

          अशाच वेळी मानवी भावनांचे रूपांतर होतं शक्ती मध्ये शस्त्रा मध्ये . तीच शक्ती , तीच शस्त्रे मानवाला बळ देतात कशाशीही  युद्ध करण्याचे ,  कशाशीही लढा देण्याचे , तेच बळ गण्याच्या अंगी साकारले . त्याने एक जोरात हिसका देऊन राम्याला खाली ओढून घेतले . तेव्हा काळोखात एकच कल्लोळ माजला . नेहमी जिंकणाऱ्या खेळाडूला हरवल्यानंतर निघतो तसा आवाज असावा .

      पुन्हा एकदा एक मोठी किंकाळी ऐकु आली आणि पुन्हा निरव शांतता  . या वेळी पुन्हा राम्या हवेत उडाला .  ज्याप्रमाणे लोखंड चुंबकाकडे धाव घेते तसा राम्या काळोखाकडे ओढला जाऊ लागला . मात्र यावेळी गण्याची ताकद कमी पडली .  राम्या काळोखात विलीन झाला आणि गणाच्या हातात राहिला त्याचा मनगटापासून तुटलेला हात .  जो राम्याने गच्च आवळला होता गण्याच्या हाताभोवती . त्याच्यातून रक्त ठिपकत होतं .

    पुन्हा एकदा काळोखात गलका झाला आता पुढची शिकार होणार होती गण्याची किंवा मन्याची ....
.  मन्या अजून पुतळ्यासारखा स्थिरच होता . गण्या त्याला ओरडत होता पण काही उपयोग नव्हता .  पण तरीही गण्याने त्याचा हात सोडला नाही घट्ट दाबुन धरला . पण यावेळी गण्या काळोखाकडे खेचला जाऊ लागला .

     आणि अचानक सर्वत्र प्रकाश चमकू लागला .नष्ट झाला काळोख  आणि सर्वत्र प्रकाशाचे साम्राज्य पसरले . सामान्य माणसाला एवढचं दिसत होतं की जी काही दुष्ट शक्ती होती,  ती नष्ट झाली होती . तिला नष्ट केलं होतं कुणी तरी चांगल्या शक्तीने . पण एका घटनेमागे हजारो वर्षापासून चालत आलेला चांगल्या-वाईटाचा संघर्ष पुन्हा एकदा समोर आला होता . त्या संघर्षात समावेश होता मानवाला न समजणाऱ्या गोष्टीचा . फक्त त्याला दिसत होता जय आणि विजय . पडद्यामागच्या घडामोडी त्याला न कळणाऱ्या होत्या .

        आणि हवेत उडालेला गण्या धपकन खाली आपटला तो काळोख गेला होता . ते भुताटकी गाव गेलं होतं . ते पुन्हा जंगलात आले होते . मन्याही हालचाल करू लागला . पण हे सारं झालं कसं  ? कुणी केलं ?

                तेव्हाच त्यांच्या समोर राम्या उभा राहिला . त्याच्या सर्वांगाभोवती पांढर्‍या प्रकाशाचं वलय होतं . चेहऱ्यावरती समाधान होतं .  तो राम्याचा आत्मा होता . राम्याचा मृत्यू झाला . पण त्याने दोघांचाही जीव वाचवला . दोघालाही अश्रू अनावर झाले . दोघेही मिठी मारायला पुढे सरले .  पण शेवटी तो आत्मा होता  .

         "  व्हायचं ते होऊन गेलं आता रडू नका " राम्या म्हणाला

" राम्या लगा माझ्यामुळे तू मेला , खरं म्हणजे मीच मरायला पाहिजे होतं " गण्या

" अरे गण्या घडायच्या असतात त्या गोष्टी घडून जातात स्वतःला दोष देऊ नको " राम्या

" लगा मला तर काहीच आठवत नाही "
मान्या रडत बोलला " गण्याने तुला वाचवायचा तरी प्रयत्न केला पण मी काहीच केलं नाही "

"  असुदे हेच होतं माझ्या नशिबात तुम्ही स्वतःला दोष देऊ नका " राम्या

" अरे पण आपण जिवंतपणी त्याच्याशी सामना करू शकलो नाही , मृत्यूनंतर अशी कोणती गोष्ट घडली की ज्यामुळे त्यांना हरवलं . " गण्या

" अरे मी काहीच केलं नाही ही सगळी शेवंता ची जादू आहे "
राम्या

" काय "   दोघेही एकदम ओरडले " म्हणजेच शेवताचं भूत आहे "

" अरे तुझ्या स्वप्नात आलेली दुसरी तिसरी कोणी नव्हती ती शेवंताच होती " राम्या

"  होय गणेश मीच होते शेवंता "
   गण्याने आवाजाच्या दिशेने पाहिले आणि पाहतच राहिला

" मला काहीच शक्य नव्हतं अरे शेवंता होती म्हणून हे शक्य झालं " राम्या

" मी फक्त तुला मदत केली तीही अगदी थोडीशी .तुझ्या मनात इच्छा होती तुझ्या मित्रांना वाचवायचे . म्हणूनच मी छोटीशी मदत करू शकले .आणखी एक गोष्ट आपण त्यांना नष्ट केलेलं नाही " शेवंता

" म्हणजे पद्रीचं भूत अजुनही आहे " तीघेही एकदमच म्हणाले

" हो अजून सारं काही जिथल्या तिथे आहे . तुम्हाला फक्त काही वेळ मिळालाय येथून जाण्यासाठी . आणि हे सारं काम जॉनचं नाही . " शेवंता

"जॉन म्हणजे ? "

" पाद्री तुमचा . त्याचं नाव जॉन . तो फक्त बाहुल आहे त्या विशाल शक्ती च्या हातातलं . जिचा काहीतरी उद्देश आहे . ज्या उद्देशासाठी मागच्या दीडशे वर्षांपासून मी या जंगलात भूत बनून फिरत आहे . माझी मुक्ती झाली नाही " शेवंता

" पण पादरी तर म्हणत होता की तुमच्या वडिलांनी डांबून ठेवलं होतं तुम्हाला . तुम्ही नंतर अन्नत्याग केला . त्यामुळे तुमचा मृत्यू झाला व तुम्ही मुक्त झाला . त्यानंतर पाद्रीच्या भुताने  तुमच्या वडिलांना मारले . " गण्या

" बरोबर आहे तुमच्या वडिलांनी पाद्रीला मारलं नसतं तर हे सगळं झालं नसतं " मन्या

" कोण म्हणालं तुम्हाला बाबांनी जॉनला मारलं आणि मी आत्महत्या केली . हे सारं खोटं आहे "  शेवंता

" पण मग झालं तरी काय होतं ? कोणी मारलं तुम्हाला नि तुमच्या बाबांना आणि पाद्रीलाही "  गण्या

" मला एवढंच माहिती आहे की मला जॉनने मारलं . पण बाबांना व जॉनला कोणी मारलं हे माहीत नाही " शेवंता

" काय पाद्रीने मारलं तुम्हाला " मन्या

"  हो "

" पण तुमचं प्रेम होतं ना त्याने तुम्हाला का मारलं ? " गण्या
.
.जॉननेच मारले मला . आपल्याकडे जास्त वेळ नाही , तुम्ही पटकन निघा अन्यथा तुमचा ही जीव जाईल . " शेवंता

"  नाही त्याने आमच्या राम्याला मारले . त्याला आणि असं सोडणार नाही " मन्या

" होय ज्याने आमच्या राम्याचा अंत केला , त्याचा अंत केल्याशिवाय आम्ही जाणार नाही " गण्या

"  गण्या मन्या असं करू नका लगा हो . जोपर्यंत तुम्ही जंगलातून सहीसलामत बाहेर जाणार नाही तोपर्यंत मला मुक्ती मिळणार नाही .  तुम्ही शेवंताचं ऐका पटकन बाहेर पडा "  राम्या

   " इतकी वर्ष आपण एकत्र राहिलो आता मरण आले तरी येऊ दे , एकत्रच मरू " गण्या

"  तुम्ही सांगा काय झालं ते " मन्या


" तुम्हाला काय माहित आहे आणि काय माहित नाही हे मला माहित नाही .  तुम्हाला किती खरं किती खोटं माहित आहे हे ही मला माहित नाही . आता मी सांगणार आहे याची सुरुवात कुठे झाली ? यासाऱ्या घटनांचा इतिहास काय आहे ? "

" मी पाटलाची मुलगी  . आमच्या घरात परंपरागत पाटिलकी चालत आली होती . आमचं घर बऱ्यापैकी सधन . बाबांचही बऱ्यापैकी शिक्षण झालं होतं . त्यावेळी गावात शाळा नव्हती म्हणून लहानपणापासूनच त्यांनी मला त्यांच्या मित्रांच्या म्हणजेच सदू काकाच्या घरी मुंबईला शिकायला ठेवलं होतं . मी तिथेच लहानाची मोठी झाले फक्त सुट्टी पुरतं गावात  यायची.  माझ्या शालेय शिक्षण पूर्ण झालं . बाबांच मत  होतं की आता बास करावं शिक्षण . पण काकांनी बाबांना समजावलं की कॉलेज पूर्ण करू दे . इतक्या वर्ष शिकवलं , थोड्यासाठी माघार नको .

    " मी कॉलेजला जाऊ लागले.  हेच माझ्या आयुष्यातील सोनेरी क्षण होते .  हातातील वाळू कशी निघून जावी तसे हे क्षण झटपट निघून गेले . पहिल्याच वर्षी माझ्या आयुष्यात जॉन आला .  तो प्रोफेसर होता . तरुण होता , सुंदर होता ,  छान दिसायचा ,  छान राहायचा .  काळी पॅंट , पांढरा शर्ट त्याच्यावरती काळा कोट , पायात शूज ,एका हातात पुस्तक नि दुसर्‍या हातात पाईप . सारं कसं छान वाटायचं .असं वाटायचं की  जॉनने शिकवत राहावं आणि मी असंच शिकत राहावे . त्याच्या पहिल्या लेक्चर पासून मी त्याची दिवानी झाले होते . म्हणून मी नंतर काही ना काही कारण काढून त्याच्या बरोबर जास्त वेळ घालवू लागले  . सुरुवातीला मला वाटायचं की तो मला टाळायचा प्रयत्न करतो पण नंतर तो ही माझ्यात मिसळू लागला . आमचा एकमेकांबरोबर चा वेळ वाढत होता . आम्हाला माहीत होतं आम्ही दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडलो.

       पण प्रश्न होता प्रपोज करण्याचा .  मग एक दिवस त्यानेच मला प्रपोज केला .  मी नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता .  मी हो म्हणाले पण त्याला भलतीच गडबड होती . तो सरळ सदु काकाच्या घरी आला आणि लग्नाची मागणी घातली .  मला माहित नव्हतं सदू काका काय म्हणतील ?  पण काय आश्चर्य ते हो म्हणाले .  त्यांचा काही आक्षेप नव्हता . पण त्यांच्या मते बाबा तयार झाले नसते . मग सदू काकांनीच जॉनला पाद्री बनवून गावात जाण्याची कल्पना सांगितली .  कारण जेव्हा सदूकाका नि बाबा एकत्र शिकायला होते तेव्हा ते दोघेही चर्चमध्ये प्रार्थनेला जात असत . तिथला पाद्री जो काही सांगेल ते बाबा लक्ष देऊन ऐकायचे .  काही अडचण आली तर तो सांगेल तसे उपाय करायचे . पाद्री लोकांविषयी बाबांच्या मनात अपरंपार आदर होता . म्हणूनच पाद्री बनून जर मला मागणं घातलं तर ते नाही म्हणणार नाहीत अशी अटकळ आम्ही बांधली  . खरंतर ही कल्पना इतकी चांगली नव्हती पण जॉन पाद्री म्हणून गावात यायला तयार झाला . त्यामुळे आम्ही बाकीचा जास्त विचार न करता याच योजनेवर अंमलबजावणी करण्याचे ठरवले .


" मी पुढे आले नंतर महिन्याभराने जॉन आला .  आल्या आल्या सरळ आमच्या घरी आला . कारण गावात काय करायचं झालं तर बाबांची परवानगी घेणं आवश्यकच होतं. त्या दिवशी आमच्या घरीच राहिला त्याने बाबांना काय काय सांगितलं काय माहित ?  पण बाबा अगदी खुश झाले . त्यांनी चर्च बांधायला सुरुवात केली त्याचबरोबर जॉनसाठी दोन खोल्या बांधायला चालू केल्या . जॉन  मराठी चांगल्या प्रकारे बोलायचा .  लोकांमध्ये फिरायचा , त्यांना चार गोष्टी सांगायचा , रविवारी चर्चमध्ये प्रार्थनेला बोलवायचा .  प्रार्थना झाल्यानंतर कधी कपडे , कधी मिठाई काही ना काही वाटायचं . तो गावाचा चर्चेचा विषय झाला होता . बाबांचं त्याच्याविषयीचं मत चागलं झालं होतं .  सदू काकांना जाऊन ज्याने माझी मागणी घातली होती तो जॉन बाबांना माझी मागणी घालायला घाबरत होता . तो दिवस पुढे ढकलत होता . मग एक दिवस सदूकाकाचं पत्र आलं .  बाबांना त्यांनी आमच्या विषयी सर्व सांगितलं होतं . त्यांचा आणि बाबांचा पत्रव्यवहार चालू होता तेव्हा त्यांनी याबाबत सर्व काही बाबांना कळवलं होत . त्यांनी आम्हाला फक्त त्यांच्या समोर जाऊन उभा राहायला सांगितलं होतं .

" अरे जॉन एवढं सारं करायची काही गरज नव्हती . तू जरी सरळ मागणी घातली असती तरी मी नाही म्हणालो नसतो . "
त्यांच्या दोघात बरीच चर्चा झाली बाबा शेवटी म्हणाले
"  पण लग्न लग्न मात्र आमच्या पद्धतीने होणार बर का ? अगदी पद्धतशीर .....! "


   " मग आमचा साखरपुडा झाला . जॉन अनाथ होता म्हणून त्याच्या बाजूने सदू काका व काकू होत्या   . साखरपुड्यानंतर जत्रा आली म्हणून हळदी व लग्न पुढे ढकललं . त्याकाळीही जत्रा खूप मोठी  व्हायची . भरपूर दुकानं लागायची .  अगोदरच मी पाटलाची मुलगी आणि बरोबर गोरा साहेब त्यामुळे सारेजण आमची बडदास्त ठेवत होते . आमचं सारे काही राजेशाही थाटात चालू होतं .  खरंच तो जत्रेतील दिवस माझ्या आयुष्यातला अत्यंत सुखाचा व आनंदी दिवस होता . पण तो आनंद पुढे येणाऱ्या दुःखाची नांदी सांगत होता हे मला माहीत नव्हतं . कारण पुढे जे काही झालं ते खूपच दुःखदायक होतं     .
   
" त्या रात्री कुणातरी क्रांतिकारकांचा गट जॉनला उचलून घेऊन गेला .  मी फार घाबरले मला वाटत होतं आता जॉनचा जीव वाचणार नाही .  मी तेव्हा ग्लानी येऊन बेशुद्ध पडले.  शुद्धीवर आले तेव्हा कळालं जॉन जिवंत होता आणि ज्यांनी जॉनला नेलं होतं ते क्रांतिकारी नव्हते दरोडेखोर होते . त्यांनी जॉनकडे जे काही सोनं होतं ते लुटून त्याला बेशुद्ध करून गावाबाहेर टाकून दिलं होतं .

    पण त्या दिवसानंतर जॉन पूर्ण बदलला . इतक्या दिवस मी ज्या व्यक्तीला ओळखत होते ती व्यक्तीच मला दिसली नाही . मला वाटायचं हे शरीर फक्त जॉनचं आहे पण त्याच्या वरती नियंत्रण दुसऱ्या कोणाचं तरी आहे . मी कोणाला बोलले नाही . मला वाटलं तो घाबरला असेल होईल हळूहळू सारं काही व्यवस्थित . पण बाकी कोणालाच काहीही फरक जाणवत नव्हता .

     अशातच आमची हळदी झाली .अगोदरच गोरा-गोमटा असलेल्या जॉनला जेव्हा हळद लागली तेव्हा ते ध्यान पाहण्यासारखं होतं . मी तर नुसती हसत सुटले. एरवी चेष्टा मस्करीला खळखळून हसून दाद देणारा जॉन मख्खासारखा गप्प बसून होता .  त्याचं वागणं दिवसेंदिवस फारच विचित्र होत चाललं होतं  .

   हळदीचा कार्यक्रम उरकल्यानंतर तो मला म्हणाला
"सगळे झोपल्यावर मळ्यात ये , माझ्या खोलीवर , मला काहीतरी सांगायचं आहे ,  please come "

मला माहित होतं तो बोलावून त्याला कशाचा त्रास होत आहे हे सांगेल .  म्हणून मी सगळे झोपल्यानंतर घराबाहेर पडले आणि मळ्यात जाऊन पोहोचले . मी मळ्यात पोहोचले तेव्हा रात्रीच्या अडीच किंवा तीन वाजले असतील .मी दार ठोठावलं . पण त्याने उघडलं नाही मी ढकलून पाहिला तर उघडच होतं .

    मी आत गेले . सर्व घरात फुलांचा सुगंध दरवळत होता जॉनने चक्क घर  सजवलं होतं .

" जॉन  sss जॉन sss  काय हा वेडेपणा ..घर का सजवले ? "

अचानक मला कोणाची तरी मिठी पडली . मी घाबरत होते पण तो जॉन होता

" We are going to marry dear
उद्या आपले लग्न होणार आहे "

" उद्या होणार आहे ना .आज का सजवले ? "

" कारण उद्या तू नसशील  ....."

तो इतक्या थंड पाणी हे वाक्य बोलला की माझ्या जिवाचा थरकाप उडाला .

" काय काहीही काय  बोलतोय ? "

त्याचे उष्ण श्वास मला माझ्या मानेला जाणवत होते

" म्हणजे उद्या तू माझी  प्रेयसी नसशील बायको असशील "

   त्याने त्याचं बोलणं सावरून घेतलं पण तो थंडपणा मला घाबरूवून गेला होता . मी स्वतःला त्याच्या मिठीतून सोडवून घेतलं

" हे सांगायला बोलवले का तू मला ..

" नाही

   असं म्हणत त्याने मला ओढून घेतले व माझ्या ओठावर ओठ टेकवले त्यापुढे जे काही झालं त्यावरून मला इतकं कळालं की तो जॉन नव्हता .  त्याचं फक्त शरीर होतं .

त्याचे वासनेने बरबटलेली डोळे नंतर काळेकुट्ट झाले .हळूहळू खोलीतल्या संगंधाची जागा दुर्गंधीने घेतली. कसली घाणेरडी दुर्गंधी होती . नंतर नंतर त्याच शरीर पण सडत गेलं . त्याच्या सर्वांगावर काळेकुट्ट डाग पडले . नंतर-नंतर ते मानवी शरीर नष्ट होत गेलं व त्याठिकाणी अमानवी अतिंद्रिय शक्ती अवतरली . ती नक्कीच क्रूर होती .भयंकर होती .भीतीदायक होती . तिच्या बाहुपाशात माझं शरीर आवळलं गेलं होतं . कसलातरी तरी केसाळ , लबलबित , घाणेरडा ,दुर्गंधीनें भरलेला असा तो आकार माझ्या शरीराचा यथेच्छ उपभोग घेत होता . मी काहीच करू शकत नव्हते . त्या दुष्ट शक्तीपुढे मी काहीच नव्हते .अगदी कागदी कस्पटाप्रमाणे होते .

   फक्त मला एवढच कळत होतं तो जॉन नव्हता ते शरीरही जॉनचं नव्हतं  . त्या रात्री मी नेहमीसाठी निद्रिस्त झाले .

" पण ज्यांच्या शरीरात जे कोणी होतं त्याने तुम्हाला का मारलं ? " गण्या म्हणाला

"  ते मलाही माहीत नाही . ते जे काही आहे त्याच्यामुळेच मी अजूनही मुक्त झालेली नाही . त्यांनेच मला बंदिस्त केलेले आहे .

  " पण तो आहे तरी कोण ?

"  मीच तो " एक खर्जातला खरखरीत आवाज . कोणीतरी आपल्या लांब नखाने लोखंडावर घासल्यावर येईल तसा , कानाला कर्णकर्कश्य व कटू वाटणारा असा आवाज आला

" मीच तो " एक खर्जातला खरखरीत आवाज , कोणीतरी नख्यांनी लोखंडावर घासल्यावर येईल तसा आवाज आला.

" मीच तो ज्याने गण्याला जंगल जाळण्यापासून रोखले .
" मीच तो ज्याने तुम्हाला तिघांनाही त्या बनावट चर्चमध्ये नेलं
" मीच तो ज्याने शेवंताच्या मृत्यूची खोटी गोष्ट सांगून तुम्हाला फसवून तुमचं रक्त घेतलं
" मीच तो ज्याने शेवंताला गाण्याच्या स्वप्नात प्रवेश करू दिला
" मीच तो , जो मशाल दाखवून तुम्हाला इथं  घेऊन आला
" मीच तो काळोख ज्याने राम्याचा अंत केला
आणि
" मीच तो ज्याने जॉनच्या शरीरात प्रवेश करून.........

किती विचित्र आवाज होता . त्या आवाजाने गण्या व मन्या दोघांच्याही अंगावर काटे आले. इतका वेळ ज्या गोष्टीपासून दूर पळत होतो , ज्या गोष्टीपासून वाचायचा प्रयत्न करत होतो तीच गोष्ट आता समोर उभा राहिली होती .  त्यामुळे त्यांच्या काळजाचा थरकाप उडत होता .

" आमचा बळीच द्यायचा होता तर अगोदरच द्यायचा नव्हता का ? एका फटक्यात गोष्ट संपवून टाकायची होती . आमचा इतका छळ करायची काय गरज होती ?  " गण्या तावातावात  बोलून गेला

" शेवंताssss  ये ना ग्.. माझी लाडकी शेवंता "
तोच तो घाणेरडा आवाज शेवंताला हाक मारत होता
गण्या ,  मन्या त्याच्यापुढे एक शुल्लक निरुपद्रवी प्यादे होते .  त्याचे दोघांकडेही लक्ष नह्वते .

"  सांगा तुम्ही आम्हाला का मारून नाही टाकत , असा छळ का लावलाय  आमचा ? " मन्या

" मारेन ,  मारेन , वेळ आली की लगेच मारेन .  सध्या मी माझ्या लाडक्या शेवंताला शोधतोय .  इथेच तर होती . "

मन्याची शीर सनकली . तो वेड्यासारखं करायला लागला .  कोणी दिसत नव्हतं .  आवाज चहूकडून येत होता .  आतापर्यंत झालेल्या घटना काय कमी होत्या त्यात भर म्हणून हे सगळं .  आणि जीवही जात नव्हता , मोकळा व्हायला .  मन्याच्या मनावर प्रचंड ताण आला .

" आयला असं तीळ-तीळ तुटुण मरण्यापेक्षा एकदाच मेलेलं बरं "
आणि तिथल्याच दगडावर जोरजोरात डोक आपटू लागला .

"  आरं  मन्या , काय करतोय लगा "
गण्या त्यांना अडवायला गेला पण त्यांना गणालाही ढकलून दिलं .

पुन्हा तोच खर्जातला कर्णकर्कश आवाज आला
" मारायचा आहे तुला ,  गडबड आहे ,  मर मग . "

तेव्हाच मन्या हवेत उडाला .एखाद कलिंगड हत्तीच्या पायाखाली यावे तसे त्याच्या मस्तकाच्या चिथड्या उडाल्या .
अपरिमित रक्त सांडू लागलं . पण ते सार हवेतच राहिलं .  कसलंतरी गोलाकार परदर्षक भांड असल्याप्रमाणे . मन्याचं धडा विना व रक्तात बुडालेलं शरीर हवेत अधांतरी तरंगत होतं .

पुन्हा एकदा आवाज आला
" तुला पण मरायचं का ? आत्ताच सांग . मला वाटलं होतं तू थोडा फार हुशार असशील , पण तू तर महामूर्ख निघाला .  अरे तुम्ही तिघही माझ्या लाडक्या शेवंती नावाच्या मासोळी साठी जाळं होता रे ..  जाळं .....  "

   " माझी शेवंता , तिला दुसऱ्याला झालेला त्रास सहन होत नाही , आता सापडली जाळ्यात ,  माझ्यापासून इतकी वर्षे लपत होती आता सापडली ना जाळ्यात . "

" आता तुझं नी माझं मिलन होणार , किती तरी युग आता आपण एकत्र घालवणार , अगं माझी शेवंता , बोल ना तू , बोलत का नाही  ? "

तेव्हाच शेवंता च्या आवाजात गण्या बोलला
" कोण आहेस तू ? का मला त्रास देतोय ₹ जॉन आणि मी सुखाने जगलो असतो तु कोणा आला आमच्या आयुष्यात "

शेवंताला गणाच्या शरीरात प्रवेश करायला भाग पाडले  तेव्हाच त्या अघोरी शक्तीने शेवंताला गण्याच्या शरीरात कैद करून टाकले .

" शेवंता हे तू बोलतेस !  किती वर्षातून ऐकला हा तुझा मधुर आवाज ...! हीच ती वेळ आहे आपण दोघे एकत्र येऊ .  मग तू चांगलेच ओळखशील मला ...."

आणि क्षणात आजूबाजूचा पूर्ण परिसर बदलला . ते एका उंचच्या उंच कड्यावर होते . आजूबाजूला जिथवर नजर जाईल तिथपर्यंत मिट्ट काळ्या पाण्याचा समुद्र पसरला होता .  कसलाही आवाज नव्हता .  भयान शांतता . तो समुद्र ही विचित्र होता . त्याच्यावर ती एकही लाट नव्हती .  ना कसली हालचाल होती .  ना हवेची झुळूक होती . ना  वाऱ्याचा आवाज होता . त्या ठिकाणी सजीवाचे कोणतेच लक्षण नव्हते . मनावर एक दडपण होते . तो अघोराचा समुद्र होता .

धप्पकन आवाज झाला मन्याचे छिन्न झालेले शरीर त्या समुद्रात कोसळले . इतक्या वेळ शांत असलेल्या त्या समुद्राने रौद्र रूप धारण करून ,  उंच उंच काळ्यापाण्याच्या लाटा उसळवून त्या पडलेल्या धडाचा  स्वीकार केला  .

त्यावेळी फक्त गणा जिवंत होता .  मन्या , राम्या , शेवंता जॉन सारी भूतेच होती  .  शेवंता गण्याच्या शरीरातून बाहेर निघाली . गण्या च्या एका बाजूला राम्याचे आणि मन्याचे व दुसऱ्या बाजूला जॉन व शेवंताचे आत्मे होते . त्यांच्या समोर एक गोलसर काळपट आकार होता त्यातून आवाज येत होता

" बघ हा आत्मशक्तीसाठी व रक्ताच्यासाठी भुकेलेला समुद्र .  शेवंता हा समुद्र म्हणजे मार्ग आहे आपल्या मिलनाचा ,  युगानुयुगे एकत्र राहण्याचा , त्यासाठी फक्त या साऱ्यांची आहुती द्यायची आहे ."

आणि त्या गोलसर काळपट  आकारातून दोर बाहेर यावा तसे काहीतरी बाहेर येऊ लागले ..... व ते राम्या व मन्या यांच्या आत्म्याभोवती आवळले जाऊ लागले.

" या दोघांची पहिली आहूती.....

इतका वर्ष जॉन त्याच्या गुलामीत होता . त्याला त्या
' कुणाच्यातरी ' शक्तीची कमजोर नस कळलीच असणार...

त्याच वेळी जॉनने त्या गोलसर काळपट आकारावरती जलद चाल केली .  त्या काळ्या ,  गोलाकार ढगातून चित्रविचित्र आवाज आले  . शेवटी तो गोलसर काळपट आकार नष्ट झाला व खाली पडला एक हाडांचा सापळा . ज्याला कुठे कुठे मांस राहिले होते  . एक भयानक दुर्गंधी पसरली .

" आपल्याला ह्याला नष्ट करायला पाहिजे "जॉन म्हणाला

" पण कसे "  शेवंता

" कोणत्याही नाण्याला दोन बाजू असतात . तसेच शक्ती ही दोन प्रकारची असते , विचारही दोन प्रकारचे असतात .त्या दोन बाजू म्हणजे चांगले व वाईट , सुष्ट व दुष्ट , सकारात्मक व नकारात्मक ,  पवित्र व अपवित्र आणि मंगलमय व अमंगल .  दोन्ही बाजूंना एकमेकांपासून धोका असतो . कारण ज्या ठिकाणी एक प्रबळ असते तिथे दुसरीला जागा नसते .  किंबहुना जी बाजू प्रबळ असते ती दुसरीला संपवायचा किंवा आपल्या हद्दीतून घालावायचा प्रयत्न करत असते . आपल्या या सृष्टीमध्ये अनंत काळापासून मंगलमय , पवित्र शक्तीचा वास आहे व अपवित्र दुष्ट शक्ती त्या शक्तीच्या विरोधात कटकारस्थाने करून आपले स्थान प्रबळ व आपले वर्चस्व निर्माण करायचा प्रयत्न करत आहे . मात्र नेहमी सत्याचा विजय होत आलेला आहे  .  यावेळी आपल्याला तेच करायचा आहे . ती मंगलमय , पवित्र शक्ती नक्कीच आपल्या मदतीला धावून येईल .

" पण नक्की करायचं काय ? "

" आपल्या पवित्र जे काही आहे ते याच्या वरती झोकून द्यायचं.  म्हणजे तुम्हाला काही चांगल्या आठवणी असतील ,
पवित्र आठवणी असतील , पवित्र गोष्टी असतील , पवित्र विचार असतील , देवाचं नाव असेल  . जे काही तुमच्यामध्ये चांगलं असेल , ज्या काही चांगल्या गोष्टी तुम्ही केल्या असतील त्या साऱ्या काही आठवा . ते सारं काही मनात आणा , आणि ते सारं नष्ट कोणामुळे होणार आहे हेही मनात आणा .  आपल्या सात्विक संतापाच्या विचार , सात्विक संतापाची अस्त्रं  त्याच्यावरती झोकून द्या . "

जॉनला शेवंताचा प्रेम आठवलं . शेवंताला जॉन आठवला , तिच्या बाबांची तिच्यासाठी जी तळमळ आठवली , सदूकाकां व काकूंचे जीव्हाळा आठवला .  अजुनही बऱ्याच गोष्टी आठवल्या . गण्याला त्याच्या मित्रांसोबतची दोस्ती आठवली. आई नव्हती पण आईची माया जाणवली .  वडिलांनी त्याला आईची कमतरता कधीच भासू दिली नाही , त्यांनी त्याला मोठा केला . मित्रांनी  प्रेम दिलं . सारं काही आठवलं. सगळ्यांनी चांगल्या गोष्टी आठवल्या . त्या गोष्टींचे , त्या विचारांचे अस्त्र बनवले नि फेकून दिले त्या पवित्र व मंगलमय दुष्ट शक्ती वरती आणि तेव्हाच नाश झाला त्या दुष्ट अमंगलमय अपवित्र शक्तीचा .  तो हाडाचा सापळा हवेत विरून जाऊ लागला .
त्यांचा विजय झाला होता .  विजय झाला होता पावित्र्याचा , मांगल्याचा , सकारात्मकतेचा .  विजय झाला होता मानवी मनाचा , मानवी नात्यांचा , मानवी भावनांचा नि साऱ्या वरती विजय झाला होता मानवाचा .

तो हाडाचा सापळा नष्ट झाला . तिथेच एक आकृती अवतरली .  बहुदा तोच आत्मा होता ज्याने हे सगळे कारस्थान केले होते .

" प्रताप तू " शेवंता म्हणाली

जॉन म्हणाला " तू याला ओळखतेस

" हो , हा माझा बालमित्र आहे .

" प्रताप तू केलंस हे सगळ पण का...?
त्या विशाल काळा समुद्राचा साऱ्यांना विसर पडला होता  .  इतका वेळ खवळलेला समुद्र पुढचा बळी न मिळाल्याने शांत झाला होता . पण तो अघोर समुद्र होता . त्याला जाणीव झाली होती घडणाऱ्या घटनांची .  कुठेतरी नोंद घेतली जात होती या साऱ्यांची . आदेश दिले जात होते पुढच्या गोष्टीसाठी .  पण या साऱ्यांची जाणीव कोणालाच नव्हती..

" सांगतो सोने ,  सांगतो , माझं ऐकून तरी घे "

"  शेवंताला लहानपणी सारे सोनीच म्हणायचे .  ती होतीच सोन्यासारखी .  आम्ही सारे मिळून राजा राणीचा भातुकलीचा खेळ खेळायचो . त्यात सोनी राणी आणि मी राजा . पण ते  फक्त खेळात होतो हे अजून मनाला पटत नाही .  पुढे सोनी मुंबईला शिकायला गेली आणि सुट्टीपुरतच गावाला येऊ लागली . तरीही सुट्टीला आली की आम्ही खेळायचो .  वय वाढले तसे खेळ बदलत गेले .  हळूहळू खेळ बंद झाले .  फक्त बोलनं वाढत गेलं . सोनी मला सारं काही सांगायची . मला वाटायचं मी तिचा खास मित्र आहे . त्या तारुण्यसुलभ वयात मी माझ्या मनाचा भलताच समज करून घेतला होता . आणि तिथेच मी चुकलो .  सोनी सुट्टी पुरती यायची आणि परत जायची . पण मी मात्र पुढच्या सुट्टीची अधाशासारखी वाट पाहायचो .

शेवटी तिची शाळा संपली . सुट्टीला घरी आली होती . तेव्हा मी माझ्या मनाचा हिय्या करून ,  मनातली गोष्ट तिला सांगितली .  तिचे बाबा केव्हाही तयार झाले असते कारण गावात तेवढा मान-मतराब होताच आमचा . पण ती मला नाही म्हणाली .  तिने मला झिडकारलं आणि तिने कारण सांगितले की
" मला अजून शिकायचे आहे .  कॉलेज करायचं आहे आहे . आत्ताच लग्न करायचं नाही आणि तसंही लग्न करून गावात राहायचं नाही "

माझ्या तळपायाची आग मस्तकाला गेली मी माझ्या बाकडे गेलो व बाला झालेली सारी हकीकत सांगितली . माझा बा लगेच पाटलाकडे माझ्यासाठी मागणी घालायला गेला . पाटील नाही म्हणणार नव्हता कारण प्रसंगी माझ्या बापानेच पाटलाला कर्जाच्या ओझ्यातून बाहेर काढला होता . पाटलाला पोरीचे पुढे साऱ्याचा विसर पडला .
म्हणाला
"पोरीला पुढे शिकवायचा आहे , थोडासाठी माघार नको . "

माझा बा म्हणला "  शिकवू द्या , शिकल्यावर लगीन लावलं तरी चालल की. "

तरीपण नाहीच म्हणाला
"  पोरीला तर पसंत पाहिजे "

माझ्या बानं  लय समजावलं
" कोण  विचारतो पोरींची पसंत वगैरे वगैरे..."

पण पाटील पुरता इंग्रजाळलेला होता . कसले आधुनिक का फिधुनिक विचार होते त्याचे .  शेवटी माझा बा तरी किती समजावणार . तो पण माघारी आला .

कुणीतरी खरच म्हणले राग हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू असतो . मी रागाच्या भरात माझ्या बापाचा खून केला .  त्यामुळे मला परागंदा व्हायला लागलं . तरीपण शेवंताला प्राप्त करण्याची इच्छा सोडली नव्हती .  मला गावागावात फिरता येत नव्हतं म्हणून नुसती जंगलात फिरत होतो .  शिकारी येत होती म्हणून  बरं झालं . किती दिवस फिरत होतो काय माहित ?

  एक दिवस जंगलात एक विचित्र प्रकार दिसला . दोन-चार सुंदर ललना एका वडाच्या झाडाखाली भर दिवसा नृत्याविष्कार करत होत्या .  मला फार विचित्र वाटलं .इतक्या जंगलात हे शक्यच नव्हतं . मी पुढे गेलो पण त्यांचं माझ्या कडे लक्षच नव्हते . त्या फक्त नाचत होत्या . तिथे एक सडपतळ इसम पडला होता . दाढी हातभर वाढली होती .  अंगावर माणसांचा एकही तुकडा नव्हता .  नुसता हाडांचा सापळा व त्यावर कातडी असल्यासारखे ते शरीर होतं .संपूर्ण शरीराला कसलं तरी पांढरे  भस्म का काही लावलेलं होतं  आणि फक्त लंगोटी घातलेली होती . तो नशा करून पडलेला असावा मी त्याला उठवलं , शुद्धीवर आणलं  तेव्हा मला कळालं की हे त्यांना स्वतःच्या मनोरंजनासाठी केलेले चेटूक होतं .

मी त्याला माझी कहाणी सांगितली . मला काय पाहिजे ते सांगितलं . तेव्हा त्याच्या डोळ्यात एक असूरी आनंद दिसला .  पण त्यावेळी मला तो जाणवला नाही .  तेव्हाच माझा शाळा सुरू झाली .  तो सांगेल तसे करत करत गेलो .  नंतर माझं काहीच चालेना ,  त्याचा गुलाम झालो ,  त्याच्या हातातलं बाहुलं झालो . जेव्हा त्याने जॉनला उचलायला सांगितलं .  तेव्हा मला खूप आनंद झाला पण त्यालाही त्यांनं गुलाम बनवलं . त्याला वेठीस धरून शेवंता बरोबर जे काही केलं त्यावेळी मी त्याचा शेवटचा विरोध केला आणि त्या वेळीच त्यांना माझं अस्तित्वच संपवलं व मी  नेहमीसाठी त्याच्या मध्ये विलीन झालो .

तो वाढत गेला .  बळी घेत गेला .  बळी देत गेला . शक्ती वाढवत गेला . आताही तो आहे . तो गेलेल्या नाही . हे त्याचंच ठिकाण आहे बळी देण्याचे , त्याचंच ठिकाण आहे आपल्या साऱ्या शक्ति वाढवण्याचे , याच ठिकाणी आतापर्यंत कित्येक बळी देऊन त्याने आपली शक्ती वाढवली आहे ,  याच ठिकाणी त्याचा अघोर समुद्राला बळी देऊन तो अघोराकडून शक्ती प्रदान करून घेतो , आता आपल्या साऱ्यांचा बळी देऊन तो या अघोर समुद्राचा स्वामी बनेल .
कारण अघोर स्वामी बनण्यासाठी त्याने केलेल्या खेळातील हा शेवटचा डाव होता .

आता मला कळतंय , की तो क्षणिक राग जर मी केला नसता तर तुम्हा साऱ्यांचं आयुष्य वाचलं असतं ।  पण माझ्या मनात त्या वेळी प्रबळ झाली होती ती काळी , दुष्ट , नकारात्मक अपवित्र , अमंगलमय बाजू .
मला माफ कर अशी म्हणायची सुद्धा माझी लायकी नाही पण मी तुम्हा सर्वांची माफी मागतो

" हा ss हा sss "
एक क्रूर हास्याचा आवाज सर्वत्र घुमला .
त्या कातळ काळोखाच्या अघोर समुद्रामध्ये लाटा उसळल्या. कर्णकर्कश्य ध्वनी आसमंतात घुमू लागला .
" माग , माफी माग .  कारण थोड्याच वेळात माफी मागायला तुही नसशील आणि ज्यांना माफी मागायची आहे तेही नसतील . "
  आणि लाटा अधिकच जोमाने उसळू लागल्या .लाटा उसळत होत्या . उंच उसळून कड्यावरती आपटत होत्या. त्या कड्यावरचा , त्या बेटावरचा एक एक आत्मा गायब होत होता . त्या अघोरी समुद्रामध्ये त्यांचा बळी दिला जात होता .
त्या अघोराने त्यांना वेळच दिला नाही . सारे आत्मे त्या अघोरामध्ये विलीन झाले .  त्यांना आता कोणी वेगळं करू शकत नव्हतं . पाण्यात विरघळलेल्या साखरेप्रमाणे त्यांचं अस्तित्व संपलं होतं . आता फक्त गण्या राहिला होता .आणि समुद्र शांत झाला .  गण्याच्या मनावर मोहिनी पडली . तो चालत जाऊ लागला कडाच्या टोकाकडे उडी घेण्यासाठी...

पण त्याच्या मनाच्या एकदम आतल्या पातळीवर संघर्ष अजूनही चालू होता .  तो विरोध करत होता .  पण तो विरोध तोकडा होता . शेवटी त्याने पराभव स्वीकार केला व मृत्यूच्या झोक्यावर बसून तो आठवणींच्या गावी गेला . आयुष्य त्याच्या नजरेसमोरून सरकून गेलं .  मात्र एक दृश्य त्याच्या नजरेसमोर पुन्हा पुन्हा तरळत राहिलं

त्याचं लहानपण . त्याची अंजली .दोघेही वेगळे नव्हतेच. एकच होते दोघे. झाडावरती चढले होते कशासाठीतरी ?
पण कधी नव्हे ते गण्याचा पाय घसरला तेव्हा अंजलीनेच त्याला हात दिला व वर खेचले....

त्याच्या मनावरची मोहनी विरघळून गेली . ते दृश्य विरघळून गेलं .  तो कड्यावरून खाली कोसळत होता आणि अंजलीने त्याचा हात पकडला होता . त्याला पुन्हा एकदा वर खेचला होता . आणि त्याचवेळी दिव्य तेजस्वी पांढरा प्रकाश सर्वत्र भरून उरला . त्याला काहीच दिसेना हळूहळू दिसू लागलं .  तेव्हा त्याला जाणवलं .  तो तिच्या मांडीवर डोके ठेवून  पहुडला होता . ती त्याच्या डोक्यावरुन हात फिरवत होती .

" कोण तू...?

" इतक्यात विसरला...

" अंजली तू मला वाचवलं ....?

" नाही तू स्वतः स्वतःला वाचवलं ....?

" आणि बाकीचे

" ते अघोरात विलीन झाले .

" आघोराचा नाश झाला का ..?

" ते आपल्यासारख्या सामान्यला शक्य नाही . आपण फक्त त्याला चुकवून येथे आहोत ....

" आता मी कुठे आहे ?

" स्वप्नात  .

" तू कुठे आहे...?

तिने काहीच उत्तर दिले नाही . ती शांत राहिली .  तोसुद्धा शांतपणे तिच्या मांडीवर पडून राहिला .  तिचे हात त्याच्या डोक्यावरती फिरत राहिले .
अचानक त्याला पाण्यात बुडाल्यासारखा झालं . त्याने डोळे उघडले.
" साहेब तो शुद्धीवर आला.."

" हवालदार त्याला इकडे आणा.
" बोल रे इथे काय करत होता ?
"  काल रात्री इथे कोण कोण होतं ?
" काल रात्री इथे काय काय झालं ?
"  सांग पटकन...
तो समुद्रात एका बेटावर होता .  काल रात्री बेटावर स्फोट झाला होता .  संपूर्ण बेट जळालं होतं . नंतर अचानकच आग विझली . ज्यांनी किनाऱ्यावरून सारं पाहिलं त्यांनी पोलिसांना कळवलं होतं...
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
                         🙏 जत्रे नंतर 🙏
शेवंता , पाद्री किंवा जॉन , राम्या ,मन्या आणि तो प्रताप सारे अघोरासाठी बळी गेले होते . ते बेट म्हणजे अघोराचं प्रार्थनास्थळ असावं . सारे बळी गेले . पण तो वाचला . त्याला वाचवलं . अंजलीने कि कुण्या दिव्य शक्तीने . अंजली त्याची लहानपणाची मैत्रीण होती . पण लहानपणा नंतर गण्याने तिला कधी पाहिलेच नव्हते . अचानक ती त्याच्या मदतीसाठी कशी आली ?  नंतर गण्याचे काय झाले.....? अचानकच ही अंजली मधून कोठे आली ? हे प्रश्न पडले असतीलच....!
याच प्रश्नांची उत्तरे घेऊन भेटूया पुढच्या कथेत जिचे नाव आहे फार्महाऊस


जत्रा इथेच संपली ......
तुम्ही जत्रा शेवटपर्यंत वाचलीत त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे .

No comments:

Post a Comment