Monday 11 May 2020

गोम



गोम


" आता मी तुझ्या तळहातावर आहे " ती मला म्हणाली . ती एक गोम होती .  तांबडा रंग , शेकड्यांनी असलेले तिचे पाय , माझ्या तळहातावर वळवळ करत होती . ती वळवळ मला सहन होत नव्हती . मी झटकायचा प्रयत्न केला पण ती गोम माझ्या तळहातावरुन  सरकत माझ्या खांद्याकडे निघाली . 
" तु मला पकडू नाही शकत.." 
" कसा नाही पकडू शकत बघतोच मी..." मी माझा डावा हात जोरात उजव्या हाताच्या दंडावरती मारला.  मला वाटलं गोम चेंदामेंदा होऊन तिथेच मेली असेल , पण ती माझ्या काखेत जाऊन बसली होती . 
" उबदार आणि ओली जागा आहे , मला अशाच जागी राहायला आवडतं ....
      मी माझे उजवी काख जोरात दाबली , पण ती  तिथून निसटून छातीवरून डाव्या काखेत गेली . मी डावी काख  दाबण्या अगोदरच ती मानेवरून चढत माझ्या केसात घुसली  . मी जोरात माझा हात केसात फिरवला . ती माझ्या डोक्यावरून हातात आली . मी हात जोरात झटकला पण तो हात माझ्या तोंडाजवळ असल्याने तिने माझ्या चेहऱ्यावरती उडी घेतली . 
" किती मउ आहेत ना तुझे गाल ...
       ती माझ्या गालावरुन फिरत कानामध्ये असलेल्या पोकळीत शिरायचा प्रयत्न करत होती . गोम साधारणपणे तीन इंच होती . कानात शिरताना तिची शेपटी मला सापडली . मी जोराने ओढायचा प्रयत्न केला पण ती कानात जातच राहिली .  शेवटी ती अर्धी तुटत माझ्या हातात आली . आता अर्धी गोम माझ्या कानात शिरली होती व अर्धी माझ्या हातात . 
" तु मला तोडलं , आता मी तुला तोडल्याशिवाय राहणार नाही... 

    ती  माझ्या कानात जोरात ओरडली . मी तुटलेली अर्धी गोम फरशीवर टाकली आणि पायाने चेचुन तिचा चेंदामेंदा करून टाकला . कानात गोम असली तरी मला फार काही जाणवत नव्हतं .  ती हालचाल करत नव्हती . जखमी झाल्यामुळे तिला पूर्ववत होण्यासाठी काही वेळ लागणार होता .  त्याचे वेळाचं मी सार्थक करायचे ठरवले .  गॅस चालू करून त्यावर ती मी पाणी तापायला ठेवलं . 

" पाण्याचा माझ्यावर परिणाम होत नाही , पाणी ओतलं तर तुझ्या कानाचा पडदा फाटलाच म्हणुन समज...

     जनु तिला मी पुढे काय करणार आहे ते समजत होतं . ती माझं मनातलं ओळखु शकत होती काय...?
" अरे , तुला सांगितले नाही का मी , मी तुझ्यासारख्या मानव रूप धारण करुन माणसात फिरणाऱ्यांचे विचार ऐकु शकते. त्यासाठीच तर बनले आहे मी ... 

    मला धक्का बसला , ती माझं विचार एकु शकत होती . ' कसंही करून आपले विचार तिच्यापासून लपवायला हवेत.....' पहिल्यांदा हाच विचार माझ्या मनात आला 
" नाही , तु माझ्या पासुन काही लपवू शकत नाही , तुझी सर्व रहस्ये मी एकु शकते....
 
   रहस्याचा उल्लेख होताच , नको असलेले विचार डोक्यात गर्दी करू लागले . मी पुरलेली रहस्ये माती उकरत त्याचं अस्तित्व प्रकट करू लागली . मी कितीही दडपायचा प्रयत्न केला तरी पुराच्या पाण्याप्रमाणे माझ्या मनाचा गुप्ततेचा बांध फोडत बाहेर येत राहिली.
" वा , सरते शेवटी ज्यासाठी आले ते मिळालं तर ...

     काय बोलत होती ती . काय मिळालं तिला...? तिला माझी रहस्ये जाणून घेण्यासाठी नक्की कोणी पाठवलं होतं...? माझी रहस्ये जर उघड झाली तर अनर्थ होइल  . तिनं नक्की कोणतं रहस्य उकरून काढलं होतं. नाही , मला तिला संपवायलाच हवं होतं ..

       का मी हे मानवी रुप धारण केलं...? भरपुर झाला खेळ.....! ' कुणी पाठवलंय तुला...? कोणतं रहस्य सापडलं तुला...? त्याचं काय करणार तु...' मी मनातंच तिला विचारलं... 

" तु नको विचार करू . वेळ आली कि कळेलंच तुला... 

    आता मला तिला संपवायलाच हवं होतं . मी कपाट उघडत एक डबी काढली , त्यातील सुइ घेत मी कानात टोचवली . हे तिला माझ्या विचारावरुन अगोदरच कळालं होतं . सुइ कानात टोचण्यापुर्वी तिने कानातून बाहेर झेप घेतली . मी सावधपणे  तिला हातात पकडलं . मघाशी तिचे तुकडे झाले होते , पण आता ती चत्मकारिकरित्या पुर्ववत झाली होती . मी हातातच तिला जोरात कुस्करलं . तिचं पीठ करून उकळलेल्या पाण्यात टाकलं .  मला वाटलं संपलं सगळं. शेवटी माझी रहस्ये माझ्याकडे सुरक्षित होती . मात्र माझा भ्रमनिरास झाला . त्या उकळत्या पाण्यात अजुन एक गोम तयार होत होती . तिचं पीठ झालेलं शरिर पाण्यात उकळून पाणी गढुळ झालं होतं . त्या गढुळ पाण्यातून तिने बाहेर उडी घ्यायचा प्रयत्न केला . यावेळी मी तिला पाहिलं , ती पुर्वीपेक्षा जास्त लांब व जाड होती . मी पुन्हा एकदा तिला हातात पकडलं व चेंदामेंदा करत पाण्यात टाकलं . ती पुन्हा अधिकच लांब व मोठी झाली . आता मला नको ते करावं लागणार होतं . 

     मानवी शरिर धारण केलं आमची मुळची  किटकनाशक क्षमता याही शरिरात असतेच . विश्वात आमची प्रजाती सर्वात शुद्ध आहे  . ती गोम आता फुट लांब व चांगलीच जाड झाली होती . मी माझं मस्तक थोडं मोठं करत जबड्याचा आकार वाढवला . माझ्या हातात ती वळवळ करत होती . तिची शक्ती आता भलतीच वाढली होती . तरीही कसतरी तिचं तोंड पकडत मी माझ्या जबड्यात घातलं व करकर चावत संपूर्ण गोम संपवली . पोटात जाताच आम्ले व जंतुनाशकांचा मारा सुरु झाला . ती गोम आता पुन्हा जीवंत होणार नव्हती .  
 
    आता या मानवी शरिराचा त्याग करायची वेळ आली आहे .  ही गोम नष्ट झाली कि मी शरिर त्यागुन मुख्यालयात या हल्ल्याची नोंद करयाला निघुन जाइन . , पण ही गोम साधी नाही , तिचं विष आमच्यासारख्या शुद्ध जीवावर देखिल परिणाम करणारं आहे. माझा मृत्यु निश्चित आहे . 

.............................................................................

आजकाल काहीही करतात लोक .  सकाळी मी सहजच टीव्ही लाउन बसलो होतो तर भलतीच बातमी पाहिली .  त्या निवेदकाचे शब्द अजुनही जसेच्या तसे माझ्या डोक्यात फिरत आहेत... 

"  ठराविक विधी करून व गोम शिजवुन खाल्ल्याने चिरतरून राहता येतं या अंधश्रद्धेने घेतला  बळी. ...

मी मागच्या प्रयोगशाळेत गेलो , अजुन एक गोम काढली...

" त्या मानवरुपधाऱ्याकडुन सर्व रहस्ये मला पाठव ... 

    मी त्या गोमेला आदेश दिला . मानवरुपधाऱ्याकडे भरपुर शक्ती होत्या . हे माणासात राहतात , आपलं सारं शिकतात , मग नंतर आपलं जग काबीज करतात . बरेच छोटे देश त्यांनी काबीज केले आहेत . त्यांची रहस्यं व शक्तींविषयी माहिती करूण घेतल्याशिवाय मानवता तग धरू शकणार धाही . 

नंतर मी वहीत नोंदवलं 
गोम क्रमाक ४३ 
हल्ला ३५७

समाप्त 

No comments:

Post a Comment