Tuesday 1 January 2019

Farm house 1

@फार्म हाऊस ही कथा जत्रा या कथेच्या पुढील कथा आहे...

  # जत्रेच्या शेवटी वाचकांना जे प्रश्न पडतात त्या प्रश्नांची उत्तरे वाचकांना फार्म हाऊस या कथेमध्ये मिळतील .

$ त्यामुळे तुम्ही जत्रा ही कथा वाचली नसेल तर  अवश्य वाचा .....

【सारांश जत्रेचा 】
¢ गावातील जत्रेमध्ये आलेला ऑर्केस्ट्रा पहायला निघालेले तीन मित्र काटेवाडीचा जंगलातील भुताच्या तावडीत सापडतात .
¢  तिथून निसटताना त्यांच्यातील दोघे मृत्यू पावतात व एका मित्राला म्हणजेच गण्याला त्याच्या लहानपणीची मैत्रीणचे ,  अंजलीचे भूत   वाचवते .....
इथून पुढचा भाग या कथेमध्ये आलेला आहे तुम्ही प्रकाशित साहित्य मध्ये जाऊन जत्रा आवश्य वाचा .
 त्या पोलिस अधिकाऱ्याने गाण्यावर ती प्रश्नांची सरबत्ती लावली होती

  " तू इथे काय करत होता ?
  " कशाला आला होता ?
"  तुझ्याबरोबर अजून कोण कोण होते ?
  " स्फोट कसा काय झाला ?

  आणि काय काय प्रश्न तो विचारत होता .
   गण्या त्याला काय सांगणार होता की तो त्याच्या मित्रांसोबत गावाच्या जत्रेला निघाला होता . काटेवाडीच्या जंगलातल्या वाटेने जाताना ते भुताच्या तावडीत सापडले .  त्यात त्याचे दोन मित्र त्याने गमावले आणि त्याला त्याच्या लहानपणीच्या मैत्रिणीच्या भुताने वाचवलं . ज्या मैत्रिणीला त्याने लहान पणा नंतर कधी पाहिलंच नव्हतं . त्यालाच माहित नव्हतं की तो इथे कसा आला . तो पोलिसांना काय सांगणार होता  ?
तो फक्त म्हणाला
" मला माहित नाही ....
" माहित नाही काय .....? चल पोलीस स्टेशनला , दोन काठ्या पडल्या की सारं माहीत होईल....

"  मला खरच माहित नाही . मी खोटे का बोलेन ...

  आणि ते खरंच होतं .  पण तो काहीच करू शकत नव्हता गपचूप पोलिसांबरोबर जाण्याशिवाय त्याच्याकडे पर्यायच नव्हता .

     माणसाच्या आयुष्यात काय होईल सांगता येत नाही .   काल रात्री गण्या जत्रेतला ऑर्केस्ट्रा पाहायला निघाला होता आणि आज तो तुरुंगात होता .  तरुंगात बसून त्यानं खूप डोकं चालवलं . त्याने खूप विचार केला की नक्की काय झालं असेल .  तो इथे कसा पोहोचला असेल . पण सारी खटपट व्यर्थ होती .  शेवटी वैतागून तो वेड्यासारखा इकडे तिकडे पाहत बसला .  त्याला बसल्या जागीहून पोलिसाचा टेबल दिसत होता . तेथे गाऱ्हाणं घेऊन येणारी माणसं दिसत होती . त्यांच्या चेहऱ्यावरचे दुःख ,  उदासीनता , क्वचित कधी राग आणि संताप सुद्धा दिसत होतं .  पण आत्ता आलेला इसम या साऱ्यांच्या विरुद्ध होता . त्याचा चेहरा हसरा होता . तो होताच थोडा विचित्र .

     काळ्याभोर झुपकेदार मिशा , पांढरे शुभ्र धोतर ,  त्यावर पांढरा सदरा  आणि काळा कोट . डोक्यावर जुने लोक घालतात तसे फेटा कम पगडी . तोंडात पानाचा तोबरा असल्यामुळे ओठ लाल झालेले . तो अर्धाभरतास त्या पोलिस अधिकाऱ्याबरोबर बोलत होता . मधून मधून गण्याकडे बोटही करत होता .  तो पोलिस अधिकारीही खुलून बोलत होता . मध्येच त्याने खिशातून पानाची चंची काढली पान तयार करून त्याने पोलिसालाही दिले आणि स्वतः खाल्ले .   शेवटी पोलिसांने गण्या कडे बोट करत काहीतरी सांगितले .  हवलदार चावी घेऊन त्याच्याकडे आला . त्याने गण्याला सोडवून बाहेर आणले .

तो पोलीस म्हणाला

"  बप्पा तुला सोडवायला आले म्हणजे काहीतरी खास असशील तू ....
" अजून काही मदत लागली तर सांगा बप्पा

" व्हय साहेब सांगतु की...  निघू का आता ..
     चला गणपतराव चला .

    गण्याला काहीच कळेना हा बप्पा कोण होता ? त्याने गण्याला का सोडवले ? आणि त्याला गाण्याचे नावही माहीत होते .  गण्या पुरता चक्रावला . जेव्हा पासून तो जंगलात घुसला होता , त्याचं आयुष्य म्हणजे धक्क्यांची मालिका झालं होतं .  धक्क्या मागून धक्के येत होते , त्याला सावरायलाही वेळ मिळत नव्हता .

" कुठं  हरवला गणपतराव येताय नव्हं ......

" पण मी ओळखलं नाही तुम्हाला ...?

" हुईल वळख हळूहळू आता चला माझ्यासंग

एरवीअनोळखी माणसाबरोबर तो गेलाच नसता पण ती वेळच अशी होती की तो गुपचूप त्याच्या बरोबर गेला ..
  सहा  खोल्यांचा मठ होता तो .  बप्पा म्हणाले होते हा आपल्या मठ .  2 बेडरूम , 1 किचन , एक हॉल व किचनला लागूनच जेवायची खोली होती .  बेडरूमही मोठ्या होत्या.  एका एका बेडरुममध्ये चार-चार बेड होते . म्हणजे खरच ही धर्मशाळा किंवा मठ असावा . त्याला टॉयलेट-बाथरूम दाखवून बप्पा जेवण आणायला बाहेर गेले

  गण्याने अंघोळ करून घेतली तेव्हा त्याला ताजतवानं वाटायला लागलं . बेडरूम मध्ये त्याच्या मापाचे कपडे ठेवलेच होते . त्याने ते बदलून घेतले व हॉल मध्ये येउन बसला . इतका वेळ त्याला विचार करायला वेळच मिळाला नव्हता . घटना इतक्या पटापट घडत गेल्या की त्याला प्रतिक्रिया द्यायला देखील वेळ मिळाला नाही . आता तो नव्या दमाने विचार करू लागला.  त्याला अंजलीने वाचवलं नंतर तो बेटावर होता .  तिथून पोलिसांनी त्याला तुरुंगात टाकलं .  तिथून बप्पाने त्याला सोडवून आणलं .

   ' हा बप्पा नक्की आहे तरी कोण ? आणि त्याला माझं नाव कसं माहित ?  महत्त्वाचं म्हणजे त्याला कळालं कसं की मी तुरुंगात आहे ? हा कसला मठ आहे नक्की ?  एक माणूस दिसत नाही . आपल्याला शोध घ्यायला पाहिजे . त्याने हॉलमधील टेबलाचा ड्रॉवर शोधायला सुरुवात केली .  त्याला पाहिजे ते काहीच सापडत नव्हते . ना कोणतं माहिती पत्र होतं ना कोणतं रजिस्टर . एकदम खालच्या कप्प्यात त्याला एक वही दिसली . त्या वही वरती एक कागद लावला होता .  त्याच्या वरती नाव होतं ^ गणपतराव ^ त्यांना पहिलं पान उघडून पाहिलं .

                      '  तिसरा शिलेदार '

व्हय तिसराच . आतापतुर दोन शिलेदार आलं  . गणपतराव तिसरा शिलेदार हाय . मागच्याबारीला पण अशीच सपनं पडली हुती .  ह्याबारीला जरा  जास्तीच  सपान  पडाया लागल्याती .

पहिल्या पानावरचा मजकूर येथेच संपला होता . दुसऱ्या पानावर मोठ्या अक्षरात एक आकडा टाकला होता .

                               ' १ '

किर्र जंगलात  तीन पोर जिवाच्या धास्तीने पळायल्यात आगीचा इस्फोट आणि दोघांचे मराण . एक जण वाचला त्यो पळतूय . पळता पळता एका समुद्राच्या बेटावर गेला .  परत स्फोट झाला . पुन्हा एकदा तो वाचला . आता तरूंगात बसलाय  . पोलीस स्टेशन वाटतय .

दुसऱ्या पानावरचा मजकूर इथेच संपला होता .

" तुला काय इचारायचं असेल तर मला इचार की इकडं-तिकडं  काय हुडकतुय " बाप्पा म्हणाले

सकाळी धोतर आणि कोटात बघितलेले बप्पा आता विजार आणि सुती बंडित ओळखू येत नव्हते .

" या वहीत काय आहे हे " गण्या म्हणाला

" तू वाचलीय ना . तुला कळालं न्हाय  का ?

" माझ्याबरोबर जे घडलं ते तुम्हाला कसं माहीत ?

" सांगतु आधी जेवण करू ,  मग सगळं सविस्तर सांगतु

   जेवण झाल्यावर ते दोघे हॉलमध्ये बसले बप्पांनी आपली पानाची चंची काढली पानाचा विढा तोंडात टाकून त्यांनी गाण्याला सारं सांगायला सुरुवात केली

     संघर्ष , लढाई सगळीकडे तेच चालू आहे . माणूस , प्राणी निसर्गातील सारे काही संघर्षच करत आहेत . अगदी किडा-मुंगी ,  छोट्यातला छोटा जीव मग तो  एकपेशीय का असेना ,  तो संघर्ष करतो . हा सारा संघर्ष चालला आहे तो स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी .  एकदा जीविताची हमी आणि पोटापाण्याचा प्रश्न मिटला की सुरू होते वर्चस्वाची लढाई .  बऱ्याचदा वर्चस्वाची किंवा सत्तेची लढाई ही सामूहिकरीत्या लढली जाते . त्यात एक गट दुसर्‍या गटावर मात करण्याचा प्रयत्न करतो . हा संघर्ष मानवाला नवा नाही .  तो त्याच्या मनात पूर्वापार चालत आले आहे . त्याला या साऱ्यांची जाणीव आहे .

     हाच संघर्ष चालत आला आहे त्याच्या मनावर ती सत्ता मिळवण्यासाठी . हा संघर्ष चालत आला आहे त्या दोन शक्ती मध्ये ज्याला आपण सुर-असुर , दैवी-राक्षसी , मानवी-अमानवी ,  चांगली-वाईट , मंगलमय-अमंगलमय , पवित्र-अपवित्र म्हणतो .  आपण हेही जाणतो त्यापैकी दैवी , मानवी चांगल्या आणि मंगलमय गोष्टीने तो संघर्ष जिंकून मानवी मनावर वर्चस्व स्थापन केले आहे . पण अजूनही अमानवी , अघोरी शक्ती मानवी मनाच्या तळाशी दडून बसली आहे .  पावित्र्याची पकड ढिली झाली की ती अघोरी शक्ती आपलं अस्तित्व दाखवून देते . आपले शिलेदार बनवते व लढाई उभारते प्रस्थापितांविरोधात . मग त्यांच्या बरोबर दोन हात करण्यासाठी ती मंगलमय ,  पवित्र शक्ती मानवाला शिलेदार बनवून पुढे करते . मानवाला सामर्थ्य पुरवते.  पण शेवटी लढाई मानवालाच लढायची असते . बरेच जण ती जिंकतात , काही हरतात , काही धारातीर्थी पडतात तर काही शत्रूचे मांडलीकत्व  स्वीकारतात .

असा शिलेदार म्हणून गण्याची निवड झाली होती .

    बप्पाने असं काही सांगितलं की गण्याची बोबडीच वळली .  तो अन मांगल्याचा , पावित्र्याचा म्हणजेच साक्षात देवाचा शिलेदार .  हे शक्यच नव्हतं . हे खरं नाही . हे सारे घडत नाही . नक्कीच काहीतरी घोटाळा आहे .

" कसं काय तुम्ही असं म्हणताय .  मला काय येतंय.  मला निवडलं असतं तर मला कळालं असतं .  माझ्यात कोणतीच शक्ती नाही . ना मला उडता येते , ना मारामारी , ना माझं कशाचं प्रशिक्षण झालं .

" अरं येड्या तू स्वतःला सुपरहिरो समजायला का काय ?  तुला निवडलं हे नक्की . उद्यापस्न तू कामाला लागशील ते पण स्वतःहून तुला कुणी सांगायला लागणार नाही ..

    आणि बाप्पा निघून गेले . गण्या मात्र वादळाने उन्मळून पडलेल्या वृक्षाप्रमाणे सुन्न पडला .  आपली मुळं वर आली आहेत आणि पुन्हा ती रुजवायचे असतील तरी लवकर गाव गाठायला पाहिजे . असं वाटून तडक तेथून बाहेर पडला व गावाकडे निघाला . बप्पाने गण्याला  पाहिलं पण त्याने गण्याला हटकलं नाही कारण त्याला माहित होतं तो उद्या याच ठिकाणी माघारी आलेला असेल .

      तो सकाळी सकाळी आला.  आल्या आल्या बाप्पांची गचांडी धरून त्यांना मागे ढकलत चढ्या आवाजात बोलू लागला

"  ए थेरड्या सांग काय केलं तू . मला गावात कोणचं ओळखत नाही . अरे माझा बाप सुद्धा मला ओळखत नाही .  सांग काय केलं ? सांग नाहीतर ....

   असे म्हणत त्याने हाताची बुक्की उचलून बप्पांना मारणार तेवढ्यात बप्पाने त्याचा मानेला धरलेला हात उडवून लावला आणि दोन्ही हाताच्या मुठी ने त्याच्यावर प्रहार केला आणि गण्या कळवळत खाली कोसळला .

बाप्पाने इतकी जलद व चपळपणे हालचाल केली कि त्याच्या वयाच्यामानाने ती सर्वथैव अशक्य होती .

"  गणपतराव इथं मी काहीच करू शकत न्हाय .  सारं काही त्या शक्तीच्या मर्जीने हुतं . तिने तुमाला निवडलं .  तवा तुमाला हे करावंच लागणार दुसरा उपायच नाही तुमच्याकडं .....

निळ्याशार आकाशाखाली  एका झाडाच्या सावलीत ते दोघे बसले होते . गण्या आणि अंजली .

" तू माझ्या स्वप्नात का येते .....


" हे स्वप्न नाही

" तुला काही सांगायचं असेल तर सांगून टाक  उगाच सारखं सारखं स्वप्नात येऊन मला छळु नकोस

कधी नव्हे ते निर्विकार राहणाऱ्या अंजलीच्या चेहऱ्यावर काहीतरी भाव उमटले . पण ते भितीचे भाव होते . आणि तेही क्षणभरासाठीच .

" माझ्यासोबत चल तुला काही तरी दाखवायचं आहे..

दोघेही चालू लागले . ते एका बंगल्याच्या गेट समोर येऊन पोहोचले . बंगल्यावरती लिहिलं होतं

                  `  _ _ व  फार्महाउस `

काहीतरी तीन अक्षरी नाव होतं पण दोन अक्षरे जागेला नव्हती .  गण्या गेट कडे जाऊ लागला

" जाऊ नकोस ..

" का ...?

" नको ...

असं म्हणून ती अंतर्धान पावली .  तिथून नाहीशी झाली .  तेव्हाच जोराचा पाऊस सुरू झाला. ढगांचा गडगडाटी आवाज येऊ लागला . त्याला असं वाटत होतं की ते ढग  गणपतराव-गणपतराव म्हणत होते .  हळू हळू आवाज वाढत गेले व स्पष्ट होत गेले

"  गणपतराव , ओ गणपतराव  डोळे उघडा . बरं झालं तुम्ही डोळे उघडलं .  मला वाटलं लईच मार पडला तुम्हाला त्याच्यामुळच बेशुद्ध झाला का काय तुम्ही ....?

" कशाला उठवलं बप्पा . अंजली मला एक घर दाखवत होती आत  चाललो होतो . पण तुम्ही उठवलं राव.....

"  घोटाळा झाला की मग गणपतराव .असू द्या आता . हातात काय हाय ?

त्यानं हात उघडला तसं सडलेल्या माणसाची दुर्गंधी नाकात शिरली .  त्याच्या हातात एक शिंपला होता . जसा गोगलगायीला असतो तसा .

        त्या शिंपल्याचा लिबलिबीत स्पर्श त्याला तेव्हाच जाणवला . प्रतिक्षिप्त क्रिये मुळे त्याने तो शिंपला जोरात खाली आपटला त्यामुळे फुटलेल्या शिंपल्यातून सडलेल्या मासांचे शिंतोडे फरशीवरती उडाले व एक गोगलगाय सरपटू लागली .

   साधारणपणे सरपटत असताना चिकट पांढरा द्रव गोगलगाय मागे सोडते .  मात्र ही गोगलगाय रक्त सोडत होती ते रक्त क्षणात वाळत होते व त्याची दुर्गंधी सर्वत्र पसरत होती .  बाप्पांनी आपल्या पायाखाली तिला चिरडून टाकले तसा तिथे रक्तस्राव झाला . ते रक्तही क्षणात वाळून गेले पुन्हा एकदा घरात भयंकर दुर्गंधी पसरली . बाप्पा पळत जाऊन फिनाईल व कापड घेऊन आले . ते सडलेले  मांस बाप्पांनी कागदावरती भरून बाहेर फेकून दिले . फरशी पुसून घेतली .  तेव्हा कुठे दुर्गंधी कमी झाली .

       त्या क्षणभरात जो काही प्रकार घडला होता तो नक्कीच अमानवीय होता पण गाण्याच्या हातात तो शिंपला आलाच कसा ? कारण तो स्वप्न बघत होता , त्यामुळे स्वप्नातील सत्यात येणं शक्यच नव्हतं . मुळात स्वप्नातही कुणी शिंपला दिल्याचे त्यांना आठवत नव्हते . मग नक्की शिंपला त्याच्या हातात आला तरी कसा ..  ?
" गणपतराव तुमच्या अंजलीने भारीच मजा केली म्हणायची .
" अहो हा शिंपला अंजलीने नाही दिला...
आणि दिला असता तरी स्वप्नातला शिंपला
सत्यात कसा येईल......?

" गणपतराव ते स्वप्न नव्हतं ..."

तेव्हाच गण्याला अंजलीचे बोल आठवले

"  हे स्वप्न नाही ......

म्हणजे तो खरंच घरासमोर गेला होता की काय....? त्याने आपल्या पायाचे तळवे बघितले त्याला ओली माती चिटकली होती .....

" पण मी तिथे जाईलच कसा......? मी तर इथेच होतो ना तुमच्यासमोर बेशुद्ध पडलेला...."

"  बरोबर आहे तू बेशुद्ध होता पण तू इथे नव्हता ...

" मला काहीच कळेना तुम्ही काय म्हणताय ते ...

"  म्हणजे फकस्त तुझं शरीर इथं होतं , तू मनाने आत्म्याने तिथेच होता .....

" पण हे कसं शक्य होतं......"

"  कळल ,  हळू-हळू सगळ्या प्रश्नाची उत्तर एकदम मिळत नसतात.....    मला एक सांगा गणपतराव तो शिंपला तुमच्याकडे कोणी दिला ?

"  बप्पा मला काहीच आठवत नाही की कोणी दिला ....नि माझ्याकडे कसा आला....?

तेव्हाच किचनमधून भांडी पडल्याचा आवाज झाला...
बाप्पा पळतच किचनमधे गेले.

"  काय झालं बप्पा...?

" काय नाय गणपतराव मांजर आहेत ..

  थोडावेळ भांड्यांचा आवाज येत राहिला . नंतर सर्वत्र शांतता पसरली .  त्या शांत वातावरणात गण्या विचारांच्या गर्तेत हरवून गेला.

'  बरोबर आहे ते स्वप्न नव्हतं . म्हणजे खरंच होतं ते सारं... अंजली म्हणाली होती ते स्वप्न नाही .' तरी त्याच्याकडे शिंपला कसा आला...? त्याला काहीच आठवत नव्हतं . त्याने डोक्याला खूप ताण दिला तरीही त्याला काही सुगावा लागेना . जसं काही कुणीतरी त्याच्या जुन्या आठवणी पुसून टाकल्या होत्या.

थोड्यावेळाने बप्पा दोन दुधाचे ग्लास घेऊन आले . त्यांनी स्वतः एक घेतला व गण्याला दुसरा दिला .  ते गोड गरम दूध पोटात जाताच त्याच्या डोळ्यावर झोपेचा पडदा येऊ लागला .  अगोदर झालेली थकावट व मनावरच्या ताणामुळे तो लगेच झोपी गेला .

' टक-टक ' कुणीतरी दगडावर हातोड्याने घाव घालावेत असा आवाज येत होता . तो आवाज हळूहळू वाढतच गेला .   कानाचे पडदे फाडून मेंदूच्या सर्व संवेदना बधीर करत होता .   तो आवाज कुठून येतोय बघायला गण्याने डोळे उघडले .  कुणीतरी दारावरती टक टक करीत होते .  खोलीत अंधार होता .  खिडकीतून पडलेल्या चंद्राच्या मंद प्रकाशात समोरच्या घड्याळाचा काटा 12 वाजल्याचे दाखवत होता . म्हणजेच तो 12 तासांपेक्षा जास्त झोपला होता .  तो बेडवरून उठून दार उघडायला गेला . दार उघडलं तर समोर अंजली
" तू
"  चल माझ्याबरोबर
"  कुठे , आता .....?
"  चल गुपचूप महत्त्वाचं आहे
"  थांब मी बप्पाला उठवतो

"  नको तू एकटाच चल , चल लवकर नाहीतर उशीर होईल...

  अंजली पुढे जात होती  . गण्या   मागे .  आता एक कॉलनी नजरेत पडत होती.  कॉलनीत सारी घरे एक सारखीच दिसत होती .  रात्रीच्या बारा वाजून गेल्याने साऱ्या घरातल्या लाईट बंद होत्या .  फक्त एकच घराच्या दुसऱ्या मजल्यावर ती पिवळसर उजेड तेवत होता .
त्या उजेडाकडे बोट करत अंजली म्हणाली

"त्याच घरात जिथे उजेड दिसतोय ना तिथल्या एका माणसाला वाचवून बाहेर आणायचं आहे

" पण मीच का...? आणि कोण आहे तिथे ....

" कारण तुझीच निवड झाली आहे आणि तिथल्या माणसा वरतीच माझं भवितव्य अवलंबून आहे .....

हे ऐकून गण्या  त्या घराकडे पळतच  निघाला .....

  घराचं दार उघडंच होतं . त्याने ते सताड उघडलं  आणि आत शिरला . दाराच्या झरोक्यातून येणाऱ्या उजेडात त्याची उंचच्या उंच काळी सावली अभद्र दिसत होती . त्याने उजव्या बाजूच्या भिंतीवरील बोर्डाची सारी बटणे दाबली पण कुठेच उजेड पडला नाही . बाहेरून पडणाऱ्या अर्धवट उजेडात त्याला डावीकडे वर जाणारा जिना दिसला .  तो जिन्यावरून चढून वर पोहोचला . एकाला एक लागून तीन खोल्या होत्या .
 
         तीनीही दार लावली होती . मधल्या दाराच्या फटीतून उजेडाची लकीर समोर पसरली होती . तो सरळ गेला आणि दार उघडलं . इतका वेळ निर्भय व निडरपणे वावरणारा गण्या भीतीने म्लान झाला . समोरचं अमानवी , अघोरी किळसवाणे दृश्य पाहून त्याचं काळीज पिळवटून निघालं....

ती संपूर्ण खोली गोगलगायांनी गच्च भरली होती . टेबलावरच्या दिव्याच्या प्रकाशात सरपटणाऱ्या गोगलगायींचा रक्ताचा स्राव किळसवाणा दिसत होता .  खोलीत जमीन किंवा कुठलीच वस्तू दिसत नव्हती फक्त त्यांचा आकार जाणवत होता...

" पण या इथे आल्याच कशा ....?

    या प्रश्नाला काहीच अर्थ नव्हता . तो अशा शक्तींच्या विरोधात लढत होता .  जिला काहीही शक्य होतं . गण्याला सर्वत्र गोगलगाय दिसत होत्या . कुठे माणूस दिसतच नव्हता ,  ज्याला वाचवायचा होतं   तोच दिसत नव्हता . त्याला कळेना कि अंजलीने त्याला कोणाला वाचवायला सांगितलं होतं .

    सरपटणाऱ्या गोगलगायींची लयबद्ध हालचाली पेक्षा वेगळ्या हालचाली त्याला जाणवल्या .  समोर खुर्चीवरती कोणीतरी होतं . त्याचं शरीर दिसत नव्हतं .  गोगलगायींच्या खाली अच्छादला होता . तो आत जाऊ शकत नव्हता कारण त्यालाही मृत्यूचं भय होतं . पण तो थांबूही शकत नव्हता. त्याला त्या खुर्चीवरचा माणसाला वाचवायला हवं होतं . पण त्याचा पाय पुढे पडायला तयार नव्हता .

   पण माणसाच्या मनाचा थांगपत्ता कुणालाच लागला नाही .  इतका वेळ घाबरून आत जायला नको म्हणणार त्याचं मन क्षणार्धात तयार झाले आणि त्याने खोलीत पाय टाकला .  त्याने पाय टाकायला आणि गोगलगाय आणि बाजूला सरकून जागा व्हायला एकच गाठ पडली . त्याचा पाय गोगलगायावरती न पडता जमिनीवर पडला....

    आणि काय आश्चर्य पुढची सारी पाउले जमिनीवरच पडत गेली . गोगलगाय बाजूला सरकत त्याच्या पाऊलाला जागा करून देत होत्या.

' पण का ....?
     ज्या गोगलगायींनी  त्या खुर्चीवरचा इसमाला जेरबंद करून त्याचा जीव घ्यायचा घाट घातला होता त्याच गणाच्या  बाबतीत इतक्या सौम्या का होत्या ?  त्या गोगलगायींचे आणि गण्याचे   जूनं काही नातं होतं का.....?

     तो खुर्चीजवळ पोहोचला तेव्हा जेरबंद असलेला इसम ,  गोगलगायींनी ज्याला यमसदनी काढायचं ठरवलं होतं , तो मोकळा झाला .  तो चांगलाच धष्टपुष्ट व हट्टाकट्टा होता . दोन गड्यांना जागेला भुईसपाट करू शकेल इतका पैलवान गडी होता  .  त्यावरून कळत होतं की त्या गोगलगायी मध्ये किती ताकत होती .

     तो खुर्चीवर बेशुद्ध पडला होता गण्याकडे फार वेळ नव्हता .  सध्या तरी गोगलगाई त्याला जागा करुन देत होत्या .  पण पुढचा अंदाज तो  बांधू शकत नव्हता . त्याने त्या इसमाचा एक हात आपल्या खांद्यावर घेत त्याला आधार देऊन चालवायचा प्रयत्न केला . पण तो खूप जड होता त्याला शुद्धीवर आणि गरजेचं होतं . त्याने त्याला खुर्चीवर बसवलं . एवढ्यानेच गण्याची दमछाक झाली .  त्यामुळे त्यांनी आधारासाठी टेबलावर हात ठेवला .  टेबलावरच्या गोगलगाय बाजूला झाल्या . तिथेच त्याला पाण्याची बाटली दिसली .  गण्याने त्याच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडले .

तो शुद्धीवर आला.
"  ती डायरी , ती डायरी  ...

गण्याने त्याला आधार देत उठवलं . दोघही दरवाजाकडे जाऊ लागले.  आताही गोगलगाय रस्ता करून देत होत्या . तो इसम बाहेर पोहोचला .

" ती डायरी , टेबलावरची ...लवकर आण....

गण्या पुन्हा आत वळला .  पण या वेळेला गोगलगायींनी जागा दिली नाही .  त्याने गोगलगाय वरती पाय दिला .  गोगलगाय मधून रक्तस्राव झाला . आणि तेव्हाच त्याच्या सर्वांगावर गोगलगायींचा वेढा पडला . तो गोगलगायींनी असून अच्छादुन जाऊ लागला . तो खाली कोसळला गोगलगाई त्याला पायापासून डोक्यापर्यंत आच्छादून टाकत होत्या . त्याला दरारून घाम फुटला . मृत्यू त्याच्या पुढे दिसत होता . हळूहळू त्याचं सर्वांग गोगलगायींनी आच्छादून टाकलं .  त्याला श्वास घ्यायला अडचण होऊ लागली . त्याच्या नाकातोंडात सर्वत्र  गोगलगाई भरून उरल्या .
मृत्यु फार दूर नव्हता....


पुढे चालू........




     तो दचकून जागा झाला .  तो बेडवरतीच होता .  तो घामाने निथळून निघाला होता . तो त्याच खोलीत होता , जिथे तो झोपला होता . शेजारीच बाप्पा बसले होते . त्याला चेहऱ्यावरचा घर्मबिंदू टिपताना पायाला भयंकर वेदना जाणवल्या . त्याच्या पायावरती कोणीतरी धारदार वस्तू ने ओरखडे   ओढले होते . त्यामुळे रक्तस्राव होत होता . बप्पांनी पटकन ते रक्त पुसून घेऊन त्याला अँटीसेप्टिक लावले .

" कुठे गेलता .....

" मला माहिती आहे तो बंगला ,  ती वाट ...

" मग चल लवकर ,  नाहीतर उशीर होईल ....

"  पण मग मी इथे आलोच कसा ....?

"  म्हणूनच म्हणलं तू शिपाई हाइस ,  साध्या माणसाला हे शक्य नाही ....

" पण ते स्वप्न होतं की वास्तव....?

" ते  स्वप्न नव्हतं ....!


     बप्पा आणि गण्या तिथे पोहोचले .ते वर गेले . त्याच खोलीत गेले . दार सताड उघडं होतं .  सर्वत्र दिव्याचा प्रकाश पडला होता .  पिवळसर उजेडात फरशीवरती रक्ताचे शिंतोडे व काहीतरी रक्ताने माखलेलं सरपटत गेल्यासारखं वाटत होतं . जसं एखादं मढं . खोलीत सर्वत्र रक्ताचे शिंतोडे उडाले होते .  रक्ताचे फटकारे मारल्यासारखी ती खोली गोगलगायींच्या सरपटण्याने झाली होती . मात्र आता तिथे एकही गोगलगाई नव्हती . ना तिथे तो मनुष्य होता ज्याला गण्याने वाचवलं होतं . मग झालं तरी काय ....? त्या मनुष्याच्या मृत्यू झाला का .....? त्याला काहीच कळू शकत नव्हतं . रक्ताने माखलेली ती खोली फक्त घडलेल्या घटनांची साक्षी होती ती .....

" ती डायरी...  ती डायरी कुठे आहे ते शोधायला पाहिजे....." गण्या

"  कुठली डायरी ........" बप्पा

" तो माणूस म्हणाला होता .....टेबलावर आहे वाटतं ....

   त्याने डायरी उचलली . ती पूर्ण कोरी होती . बाजूलाच काही पाने पडली होती .   ती पाने डायरीचीच होती पण फाडून वेगळी केली होती .  त्या पानावरती काहीतरी लिहिलं होतं . गण्या त्या पानावरचा वाचनात गुंग झाला . त्याला भानच राहिले नाही की तो कुठे होता...

पहिला दिवस

    ' आज भल्या पहाटे झोप मोड झाली .आज तिसरा खून झाला होता .पंधरा दिवसात तिसरा खून झाला होता , तो सुद्धा एकाच पद्धतीने.   पहाटेच डिपार्टमेंट मधून फोन आला " सर खून झाला आहे "  आता मी विशेष तपासासाठी नेमलेल्या पथकात असल्याने मला जाणे भागच होते .

      आता दिवसाची सुरुवातच खराब झाली म्हटल्यावर दिवस कसा चांगला जाणार . दिवसभर कोणाची ना कोणाची किर-किर माझ्या मागे होतीच . सकाळची बातमी दुपारपर्यंत सगळ्याच्या    कर्नोपकर्नी झाली त्यामुळे मंत्री साहेबांनी फोनवरून  झापले . डिपार्टमेंटमधे समोर उभा करून हजेरी घेतली ती वेगळीच . एवढ्या सगळ्या गोष्टी घडल्या तरी एक गोष्ट मात्र चांगली घडली होती .  खूप दिवसानंतर आम्ही रात्री हॉटेलवर candle light dinner साठी जाणार होतो  , म्हणून मी आनंदात घरी आलो .  घरी आलो खरा पण घराला कुलूप होते  . माझ्याकडे शिल्लक असलेली चावी होती . मी कुलुप उघडून आत गेलो .  सोफ्याजवळच्या टीपॉय वरती एक चिठ्ठी होती .

" किती फोन करायचे माणसानं ....
ड्युटीवर असलं म्हणून आम्हाला विसरायचं का ....।?
मामाची तब्येत बिघडली आहे जरा जाऊन येते ....
हॉटेलवरून जेवण मागून ठेवलं आहे ,  जेवून घ्या


मी फोन काढून बघितला तर 27 मिस कॉल होते . मी माघारी फोन लावला तर नॉटरिचेबल.

दुसरा दिवस

काही मानसे खरंच विचित्र असतात......
तुरुंगात एक कैदी आहे . त्याचा या केसमध्ये काही संबंध असावा म्हणून त्याला विचारायला गेलो तर त्या विक्षिप्त माणसाने मुर्खासारखी उत्तरे दिली .
सरळ सांगेना म्हटल्यावर नेहमीची पद्धत वापरली तरीही सांगेना  .....


झालं . त्या चार पानावर एवढाच मजकूर होता  .

त्याला पोलिसांच्या सायरनचा आवाज आला.

" काय करायचं बप्पा ...?
बप्पांनी उत्तर दिलं नाही . ते उत्तर द्यायला तिथे नव्हतेच  ते केव्हाच ती डायरी घेऊन पसार झाले होते .  तो पुन्हा एकदा पोलिसांच्या तावडीत सापडला . त्यांने पळायचा वायफळ प्रयत्न केला ,  पण तो निष्फळ ठरला . तो पुन्हा एकदा तुरुंगात पोहोचला .

एखादा कागदाचा तुकडा असेल आणि जर तो पाण्यात टाकला तर तो झिजून झिजून नष्ट होतो .  पण उलट त्याच कागदाच्या तुकड्याच्या काही घड्या घातल्या आणि होडी बनवली तर ती होडी पाण्यात तरंगते .  त्याच कागदाच्या तुकड्याच्या घड्या वेगळ्या पद्धतीने घातल्या तर तोच कागदाचा तुकडा हवेतही उडू शकतो . त्याचप्रमाणे परिस्थिती व अनुभव मनुष्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या व स्वभावाच्या अशा प्रकारे घडी घालतात की कितीही प्रतिकूल परिस्थिती आली तरी तो त्याविरुद्ध लढतो .  अनुभव मनुष्याला बनवतात  , उभा करतात आणि जगवतात .

आतापर्यंत गण्याने ही बऱ्याच चांगल्या-वाईट गोष्टी अनुभवल्या होत्या . त्या अनुभवावरून तो बरेच काही शिकलाही होता . त्यामुळे यावेळी तुरुंगात गेल्यावर त्याने स्वतःची स्थिती ढासळू दिली नाही.  तरीही राहून राहून त्याच्या मनात बप्पाचे विचार येत होते .

'बप्पा कुठे गेले असतील....?
गपचुप का गेले असतील ...?
मला मुद्दाम पोलिसांच्या तावडीत सोडलं असेल का .....?
त्यांनी ती डायरी का पळवली असेल ....?
त्या डायरीत काय होतं ....?
बप्पा खरंच माझी मदत करत होते का ....?
त्यांचा दुसरा काही हेतू असेल का ....?

असे अनेक प्रश्न त्याच्या मनात आवासून उभारले होते . त्याची द्विधा अवस्था झाली होती बप्पांनी त्याला जाळ्यात ढकलून स्वतः मोकळे झाले असे एक मन म्हणत होतं .  तर दुसरे मन त्या कृतीमागचा चांगल्या कारणाचा शोध घेत होतं आणि बप्पा कसे त्याचा हितासाठीच त्याला  सोडून गेले हे सांगत होतं .....
हे विचाराचं द्वंद्व असाच चालू राहिलं असतं पण शेवटी त्याने या विचारांना मनाच्या तळाला दाबून टाकले.

पृथ्वीवर ती माणसं मरत असली , तरीही लोकसंख्या कमी होत नाही . उलट दिवसेंदिवस ती वाढतच जाते . माणसांच्या मनात सुद्धा कितीही वेळा विचार मनातून काढून टाकले तरी प्रत्येक वेळी नवीन विचार उगम पावतातच . त्यामुळे बप्पाबद्दल येणारे विचार मनाच्या गाभाऱ्यातून हाकलून दिले पण मनाचा गाभारा रिकामा कधीच राहत नाही . त्याला आता त्या डायरीचे विचार अस्वस्थ करीत होते .

एकूणात आतापर्यंत त्याच्याबरोबर घडलेल्या साऱ्या घटनाच विचित्र व अतर्क्य होत्या .  एकामागून एक अशा विचित्र घटनांच्या शृंखलेत तो सापडला होता . ती शृंखला तुटायचे नावच घेत नव्हती .  वरचेवर वरचेवर जास्तच अशक्य कोटीतील , भयंकर नि अमानवी अशा घटनांना तो सामोरे जात होता .

पहिल्यांदा जेव्हा तो मृत्यूच्या दाढेत अडकला होता त्यावेळी अंजलीने त्याला वाचवलं .  दुसऱ्यांदा अंजलीने त्याला स्वप्नात एका बंगल्याच्या आवारात नेले .  त्या वेळी हातात आलेली गोगलगाय व घरात घडलेला प्रकार  अमानवी होता .  तिथून सुरू झालेली ही शृंखला पुढे चालत राहिली . आज रात्री पुन्हा एकदा अंजली त्याला त्या पोलिसाच्या घरापाशी घेऊन आली होती जिथे पोलीस मरणाच्या वाटेवर निघाला होता . अंजलीने त्या पोलिसाला वाचवायला सांगितले पण त्या पोलिसाला वाचवताना तो स्वतः धारातीर्थी पडणार होता .  पण न जाणो कशामुळे तो जागा झाला व त्याचा मृत्यू चुकला .

त्याला अजूनही कोडं सुटलं नव्हतं .  ते म्हणजे तो स्वप्नात असायचा पण घडणाऱ्या सारा घटना खरोखरच घडायच्या . मग तो खरेच स्वप्नात असायचा कि वास्तवात...?  का तो एकाच वेळी दोन ठिकाणी असायचा ....? पण हे कसं शक्य होतं ...? विचार करून करून त्याचा मेंदू थकून गेला पण त्याला उत्तर सापडलं नाही .

एकापाठोपाठ एक विचित्र घटना त्याच्या आयुष्यात घडत चालल्या होत्या.  त्याला कोणतीच स्पष्टीकरणं  नव्हती स्पष्टीकरणं असली तरी , त्याला  ती स्पष्टीकरण  माहित नव्हती . जेव्हा तो त्या खोलीपाशी पोहोचला तेव्हा सर्वत्र गोगलगाय होत्या , पण जेव्हा त्याने आत पाय टाकला तेव्हा त्यांनी वाट करून दिली .  त्या माणसाला बाहेर सोडेपर्यंत वाट करून देणाऱ्या गोगलगाय नंतर आक्रमक का झाल्या ...?

या सगळ्या घटनांना वरचष्मा म्हणून त्या डायरीतली विचार त्याच्या डोक्यात पिंगा घालू लागले .....जे खून त्याने केलेच नव्हते त्या खुनाचा आरोपी म्हणून त्याला पकडण्यात आलं होतं .  डायरीमध्ये ज्या खुनांचा उल्लेख होता त्या खुनाच्या आरोपात साठी त्याला पकडलं होतं ,  पण त्याने ते खून केलेच नव्हते . मग त्याला का पकडलं .....? उलट तो त्या पोलिस अधिकाऱ्याला वाचवायला गेला होता पण तोच अडचणीत सापडला.

त्याच्या मेंदूचा विचाराच्या ओझ्याने भुगा झाला . सर्व गोष्टीवरती प्रश्नचिन्ह दिसत होती . त्या प्रश्नांच्या गर्दीत त्याचं मन गुदमरून जात होतं .

" माने , संभाळून राहा बरं ....झोपशील नाहीतर
पाच- पाच खून केलेत त्यानं तुझा पण कार्यक्रम होईल म्हणून सांगतो.....

ड्युटी वरती बदलून आलेल्या हवालदाराला ,  घरी जाणारा हवलदार सावधानतेचा इशारा म्हणून हे  सांगत होता .....
पण त्याला हेच कळालं नाही की डायरी मध्ये फक्त तीन खूनांचा उल्लेख होता .  मग पाच खून कुठून काढले .
'  मी कधी केले ५-५ खून '  तो जाम वैतागला

इथे काहीतरी भलताच घोटाळा होता. त्याच्या विचारांची चक्रे उलटी सुलटी धावत सुटली . त्याच्या मनात विचारांचा गोंधळ उडाला . तेव्हाच त्याला तो बदलून आलेला हवलदार म्हणाला ....

" का ओ भाऊ , जगावर एवढा कसला राग तुमचा ....?
पाच पाच खून केले ते पण एवढ्या बेकार पद्धतीने...
तुम्हाला खून तर कसं करू वाटले एवढ्या क्रूरतेने ...? "

गोल चेहरा ,  सावळा रंग , पान खाऊन लाल झालेल्या ओठावरती काळी मिशी  ,  सुटलेलं पोट आणि समाधानी चेहरा  . तो माने हवालदार होता .

" मी नाही केले ......

" मग डिपारमेंट काय वेढं आहे का तुम्हाला पकडायला .....? आणि आज तर स्पेशल इन्वेस्टीगेशन टीमच्या हेड लाच मारायला निघालात तुम्ही .....?

" अहो मी त्यांना वाचवायला गेलो होतो आणि मीच वाचवलं त्यांना . नाही तर त्यांचा मृत्यू निश्चित होता .

"  रंगेहात पकडलंय तुम्हाला आज आणि म्हणताय मी वाचवायला गेलो होतो ...!
पण मला एक कळत नाही एवढं 5 खून केल्यावर एकही पुरावा सोडला नाही तुम्ही पण आजच कसे सापडला......?

गन्या काही बोलणार तोवर आवाज आला ...

" माने सोडा त्याला . काय करताय तिथे...?

"  साहेब तुम्ही ...? तब्येत ठीक आहे ना ..?

"  एकदम मस्त आहे , त्याला बाहेर काढा . चुकीच्या माणसाला पकडलंय  .

" हो साहेब सोडतो , लगेच बाहेर काढतो .

मानेनं  पळत जाऊन चावी आणली आणि लगबगीने गण्याला सोडवून  बाहेर काढलं .

" गणेश , गणेशच ना.... चल माझ्याबरोबर .....

हा तोच माणूस होता ज्याला गण्याने खोलीतून गोगलगाईच्या तावडीतून सोडवूलं होतं . आता त्याच माणसांना त्याची तुरुंगातून सुटका केली .
गण्याला कळेना काय चाललं होतं ते . त्या माणसाला तरी विचारावं म्हणून तो म्हणाला

"  पण तुम्ही ....

त्याला मध्येच तोडून तो  म्हणाला

" चल गपचूप माझ्या बरोबर ,  शांत रहा ,  आणि तुला भूक वगैरे लागली असलच , घरी गेल्यावरती जेवण कर .  मग निवांत बसून बोलू.....

त्याला इतक्या वेळ काहीच जाणवलं नव्हतं . पण जेव्हा जेवणाचं ऐकलं तेव्हा त्याला कडकडून लागलेली भूक जाणवली .  दोघे घरी पोहचले .  तेच घर होतं ज्या ठिकाणी तो काही तासापूर्वी आला होता . एक भयंकर अमानवी प्रकाराला ती वस्तू सामोरी गेली होती . पण त्याची खूण ती वरची खोली सोडली , तर कुठेच नव्हती . कारण जसजसा काळ पुढे जातो तसतसे स्थळ-काळात बदल होतच असतात .  दार उघडंच होतं .ते दोघेही आत गेले....

"  हाच ना गणेश ......
तो पोलिस  कोणालातरी म्हणाला

" हो ,  हो हाच ....

एक मधुर आवाज त्याच्या कानावर पडला . आपसूकच त्याने आवाजाच्या दिशेने पाहिले , आणि तो पाहतच राहिला .  मूर्तिमंत सौंदर्य त्याच्यापुढे अवतरले होते . ते काळेभोर केस ,  गोल डोळे ,ज्याकडे पाहिल्यावर  कोणताही नशा फिका वाटेल , ते गुलाबी ओठ , ज्यात गुलाबाच्या पाकळ्याहून जास्त मार्दाव होते ,  ते लांब काळे केस , तो अटकर बांधा , ती नाजूक कटी , सारे काही सुंदर होते........

क्रमशः

3 comments: